जैन तत्त्वज्ञानातील विचार मानवतेसाठी दिशादर्शक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई | जैन धर्माने केवळ मानवाचाच नव्हे, तर सृष्टीतील प्रत्येक जीवाच्या जगण्याचा आणि संरक्षणाचा विचार केला आहे. अहिंसा, सत्य, अपरिग्रह, आत्मसंयम आणि जीवदया ही जैन तत्त्वज्ञानाची वैशिष्ट्ये असून, त्यातून मानवतेच्या कल्याणाचा व्यापक विचार मांडला आहे. समर्थ तोच टिकेल असे पाश्चात्य विचारधारा सांगते, मात्र भारतीय संस्कृती प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार देते आणि त्याच्या जगण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी समाजावर टाकते. जैन धर्माने या विचाराला आणखी व्यापक स्वरूप दिले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे राष्ट्रसंत परमपूज्य नम्रमुनी महाराज यांच्या उपस्थितीत आयोजित जैन दीक्षा महोत्सवात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रथम दीक्षा स्वीकारणाऱ्या दीक्षार्थींचे अभिनंदन केले. ते म्हणाले, दीक्षेचा विचार करणे, दीक्षा घेणे आणि आयुष्यभर त्या व्रताचे पालन करणे या तिन्ही गोष्टी अत्यंत कठीण आहेत. मात्र, त्याग आणि आत्मसंयमाच्या माध्यमातून जीवनाला नवी दिशा देण्याचे सामर्थ्य जैन धर्मात आहे. जैन तीर्थंकरांनी दिलेला विचार हा केवळ एका व्यक्तीच्या कल्याणापुरता मर्यादित नसून संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचा आहे. परमपूज्य नम्रमुनी महाराज यांनी लाखो लोकांच्या जीवनाला आपल्या विचारांचा स्पर्श करून त्यांना अहिंसा, जीवदया आणि भूतदयेच्या मार्गावर आणले आहे. करुणा केवळ विचारांत नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याची शिकवण त्यांनी दिली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
दुष्काळग्रस्त भागाला मदतीचे आवाहन
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील परिस्थितीचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘अल निनो’च्या प्रभावामुळे राज्यातील मोठ्या भागाला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. दुष्काळग्रस्त भागात पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. ही परिस्थिती नम्रमुनी महाराज यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तत्काळ मदतीची तयारी दर्शविली. त्यांनी पशुधनासाठी चारा-पाणी, शेतकऱ्यांना मदत आणि नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष अभियान हाती घेतले आहे.
हेही वाचा
“डीलिमिटेशन म्हणजे उघड मतचोरीचाच प्रकार”; उद्धव ठाकरे यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दुष्काळाच्या या संकटकाळात समाजातील प्रत्येक घटकाने आपापल्या परीने मदतीसाठी पुढे यावे. केवळ करुणा, जीवदया आणि मानवतेचे विचार मांडून चालणार नाही, तर ते प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करण्याची हीच वेळ असून दुष्काळग्रस्त भागातील नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
अनंत अंबानी खऱ्या अर्थाने करुणादूत
अनंत अंबानी यांना ‘करुणादूत’ पुरस्कार प्रदान केल्याबद्दल नम्रमुनी महाराज यांचे आभार मानताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अनंत अंबानी यांची प्राणिमात्रांविषयीची करुणा विलक्षण आहे. माणसांप्रमाणेच प्राणी-पक्षी हेही त्यांचे मित्र आहेत. प्राणिमात्रांप्रति असलेली ही संवेदना त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय बनविले आहे. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली अनंत अंबानी यांनी उद्योजक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मात्र, त्याहीपलीकडे जाऊन त्यांनी भूतदयेचे कार्य एका व्यापक मिशनमध्ये रूपांतरित केले आहे. वनतारा हा त्यातून साकारलेला अत्यंत उल्लेखनीय प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
या ठिकाणी प्राण्यांना निवारा, प्रेम आणि आवश्यक उपचार मिळतात. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्याचे कामही येथे सुरू आहे. अनंत अंबानी यांच्या मनातील करुणा केवळ माणसांपुरती मर्यादित नसून प्रत्येक जीवापर्यंत पोहोचली आहे. या पुरस्कारामुळे त्यांना आणखी मोठ्या प्रमाणावर कार्य करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
दीक्षा महोत्सवास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, माजी सरन्यायाधीश भूषण गवई, उद्योजक मुकेश अंबानी, अनंत अंबानी, महापौर रितू तावडे यांच्यासह विविध संप्रदायांचे संत-महंत आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.




