Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“डीलिमिटेशन म्हणजे उघड मतचोरीचाच प्रकार”; उद्धव ठाकरे यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

मुंबई | लोकसभेत सोमवार, ३० नोव्हेंबर रोजी मांडल्या जाणाऱ्या मतदारसंघ फेररचना (डीलिमिटेशन) आणि महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयकावरून राज्यातील राजकारण तापले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या विधेयकाला कडाडून विरोध दर्शवला आहे. “पक्षाच्या हितापेक्षा मी देशहिताला जास्त महत्त्व देतो. लोकसभेत मांडले जाणारे हे विधेयक संपूर्ण देशाला त्रासदायक ठरणारे असून, हा उघड मतचोरीचाच प्रकार आहे,” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच, आपल्या पक्षाच्या सर्व ९ खासदारांना या विधेयकाच्या विरोधात मतदान करण्याचा पक्षादेश (व्हिप) जारी केल्याची माहितीही त्यांनी दिली.

विधेयकाला विरोध करण्यामागील कारणे स्पष्ट करताना उद्धव ठाकरे यांनी सीमांकन समितीच्या रचनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, “मतदारसंघ ठरवण्याचा अधिकार ज्या तीन जणांच्या समितीला दिला आहे, त्यात ज्ञानेश कुमार आहेत, मोदी आणि शहा यांनीच नियुक्त केलेले सर्वोच्च न्यायालयाचे एक निवृत्त न्यायाधीश आहेत आणि तिसऱ्या व्यक्तीची नियुक्ती ज्ञानेश कुमार करणार आहेत. या समितीत विरोधी पक्षांचे कोणतेही मत घेतलेले नाही. या समितीमध्ये सरन्यायाधीश, एक मंत्री आणि विरोधी पक्षनेते असे तिघांचे पीठ असते, तर गोष्टी वेगळ्या असत्या. ही समिती म्हणजे केवळ फार्स असून, स्क्रिप्ट आधीच तयार आहे, आता फक्त सह्या करून जनतेसमोर आणण्याचे काम उरले आहे.” २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीचा संदर्भ देत, भाजपने प्रत्येक पातळीवरील मतदारयाद्यांचा अभ्यास करून स्वतःला अनुकूल ठरतील असेच मतदारसंघ वेगळे करण्याची तयारी केल्याचा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा

बारामती ‘पॉवर मॅरेथॉन’चा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ

मतदारसंघ फेररचनेनंतर होणाऱ्या जागावाढीचे गणित मांडताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. “कोणी म्हणेल महाराष्ट्राच्या ४८ जागांवरून ७२ जागा होत आहेत, तर तमिळनाडूच्या ३९ जागाही वाढत आहेत. पण उत्तर प्रदेशच्या जागाही ५० टक्क्यांनी वाढणार आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये असलेला ३२ जागांचा फरक वाढून ४८ जागांचा होणार आहे, हे कोणाच्या लक्षात आले आहे का? देशात सर्वाधिक कर देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असूनही परतावा मिळत नाही आणि आता महाराष्ट्राचा गळा दाबला जात आहे,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“महिला विधेयक वेगळे आणा, मी पाठिंबा देतो”

या विधेयकातील महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरकारला आव्हान दिले की, “महिला आरक्षणाचा मुद्दा या विधेयकात मिसळू नका. महिला आरक्षण विधेयक आत्ता वेगळे करून आणा, मी त्याला पाठिंबा देतो.” तसेच, देशभरातील आणि महाराष्ट्रातील सर्व खासदारांना आवाहन करताना ते म्हणाले की, “आत्ता खोक्यांकडे पाहू नका, अन्यथा उद्या तुमच्याकडे कचऱ्याची पेटी येईल. कचरा पेटीत जायचे नसेल, तर या विधेयकाला विरोध करावा.”

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group