दिव्यांग खेळाडूंच्या जिद्दीला सलाम! : नगरसेवक डॉ. सुहास कांबळे
वार्षिक दिव्यांग क्रीडा स्पर्धांसाठी सुविधा विनामूल्य देण्याची मागणी

पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांचा सकारात्मक प्रतिसाद
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
दिव्यांग खेळाडूंना सरावापासून स्पर्धेपर्यंत अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. त्यावर मात करून मैदानात उतरणाऱ्या खेळाडूंच्या जिद्दीला सलाम, अशा शब्दांत शहर सुधारणा समितीचे सदस्य तथा नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांनी खेळाडूंचे कौतुक केले. दिव्यांग खेळाडूंच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपल्या क्रीडा सुविधा विनामूल्य उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
भोसरीतील संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुलात शनिवारी, २८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्यस्तरीय पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा २०२६–२७ चे उद्घाटन महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते झाले. पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्रच्या वतीने आणि माण, हिंजवडी येथील जागृत अपंग संघटनेच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.

हेही वाचा
‘अमोल कोल्हे तुम्ही कसे जिंकता तेच पाहू’; संजय राऊतांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला इशारा
पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे दरवर्षी आयोजित दिव्यांग क्रीडा स्पर्धांसाठी शहरातील महापालिकेची क्रीडांगणे, जलतरण तलाव, बॅडमिंटन व टेनिस कोर्ट तसेच इतर खेळांसाठी आवश्यक सुविधा विनामूल्य उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी डॉ. कांबळे यांनी उद्घाटनप्रसंगी महापौरांकडे केली. महापौर लांडगे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी नगरसेविका अश्विनी वाबळे, नगरसेविका नम्रता लोंढे, योगेश लोंढे, स्पर्धाप्रमुख मानव कांबळे आणि संयोजन समितीचे नंदकिशोर नाळे उपस्थित होते.

तसेच, संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रॅक खराब झाला असून, सराव किंवा स्पर्धेदरम्यान खेळाडूंना दुखापत होण्याचा धोका असल्याची बाब यावेळी निदर्शनास आणून देण्यात आली. खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी ट्रॅकची दुरुस्ती करण्यात येईल, असे महापौर लांडगे यांनी सांगितले.
“दिव्यांग खेळाडूंच्या जिद्दीला माझा सलाम! सरावापासून स्पर्धेपर्यंत वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जात हे खेळाडू मैदानात आपलं कौशल्य दाखवतात. त्यांच्या वार्षिक स्पर्धांसाठी महापालिकेची क्रीडांगणे, जलतरण तलाव आणि इतर क्रीडा सुविधा विनामूल्य उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी मी महापौरांकडे केली आहे.”
– डॉ. सुहास कांबळे, शहर सुधारणा समिती सदस्य तथा नगरसेवक.




