Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक २०२७ पर्यंत पूर्ण करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; कामाच्या प्रगतीवर एमएमआरडीएने दररोज नियंत्रण ठेवावे, दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे उर्वरित काम वेगाने पूर्ण करून हे स्मारक २०२७ पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यासाठी कंत्राटदाराने कामाचे सुधारित वेळापत्रक तयार करून उच्चाधिकार समितीकडे अहवाल सादर करावा. तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या प्रकल्पाच्या कामावर दररोज नियंत्रण ठेवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत प्रकल्पाची सद्यस्थिती, स्ट्रक्चरल स्टीलचे फॅब्रिकेशन, ब्रॉन्झ क्लॅडिंग, बांधकामाची गुणवत्ता, कंत्राटदाराच्या अतिरिक्त आर्थिक मागण्या आणि काम पूर्ण करण्याची कालमर्यादा यावर सविस्तर चर्चा झाली.

आर्थिक प्रस्तावांची तांत्रिक पडताळणी करा

कंत्राटातील तरतुदी, जीएसटी दरातील बदल, दरवाढ निर्देशांक आणि अतिरिक्त कामांमुळे निर्माण झालेल्या खर्चाची तांत्रिक व आर्थिक पडताळणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. जीएसटी दरातील बदलाबाबत कंत्राटातील तरतुदींनुसार कायदेशीर अभिप्राय घ्यावा. ब्रॉन्झ क्लॅडिंगसाठी आवश्यक साहित्य खरेदी करता यावे, यासाठी बँक हमीच्या आधारे आगाऊ रक्कम देण्याच्या प्रस्तावाची तपासणी करावी. सर्व आर्थिक प्रस्ताव एकत्रितपणे उच्चाधिकार समितीसमोर ठेवून नियमानुसार निर्णय घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  शक्तिपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन चिघळले; शेतकरी-पोलिसांत झटापट

स्टील उभारणी आणि क्लॅडिंगची कामे समांतर करा

स्ट्रक्चरल स्टीलची उभारणी आणि ब्रॉन्झ क्लॅडिंगची कामे एकमेकांशी समन्वय साधून समांतरपणे पूर्ण करावीत. आवश्यक साहित्य, यंत्रसामग्री, मनुष्यबळ, फॅब्रिकेशन आणि प्रत्यक्ष बांधकाम यांचा समावेश असलेले सुधारित वेळापत्रक सादर करावे. प्रत्येक टप्प्याची जबाबदारी आणि कालमर्यादा निश्चित करून त्यानुसार नियमित आढावा घ्यावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

स्मारकाच्या संरचनात्मक रचनेची गुणवत्ता, सुरक्षितता आणि स्थैर्य याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. संबंधित एजन्सीची जबाबदारी कायम ठेवून कामाची गती वाढवावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हा महत्त्वाचा सार्वजनिक प्रकल्प असल्याने तो निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे फडणवीस यांनी सांगितले.

दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही

स्मारकाचे काम अपेक्षित गतीने पूर्ण होत नसल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. कंत्राटातील अटी व शर्तींचे पालन करून काम पूर्ण करणे ही संबंधित कंत्राटदाराची जबाबदारी आहे. आर्थिक मागण्यांमुळे काम थांबविणे योग्य नाही. कामातील दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

संबंधित एजन्सीची काम पूर्ण करण्याची क्षमता आणि बांधिलकी तपासून आवश्यकतेनुसार पर्यायी एजन्सी नियुक्त करण्यासह कठोर कारवाईच्या पर्यायांचाही विचार करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यामुळे इंदू मिल स्मारकाच्या कामाला गती देण्यासाठी आता एमएमआरडीए आणि संबंधित कंत्राटदारावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group