TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

IFFI Goa | एआय मानवी मेंदू आणि भावनांची जागा घेऊ शकत नाही : आशुतोष गोवारीकर

इफ्फीचे महोत्सव संचालक म्हणाले, तंत्रज्ञान हे सर्जनशीलतेला पूरक साधन; चित्रपटात तंत्रज्ञानापेक्षा कथेला अधिक महत्त्व

पणजी : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कितीही प्रगत झाली, तरी ती मानवी मेंदू आणि भावनांची जागा घेऊ शकत नाही. एआय हे मानवी सर्जनशीलतेला मदत करणारे साधन आहे. तंत्रज्ञानातील वेगवान बदलांमुळे चित्रपट निर्मितीसमोर नवी आव्हाने उभी राहत असली, तरी त्यातून कथाकथनाच्या नव्या संधीही निर्माण होत आहेत. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची गरज आहे, असे मत इफ्फीचे महोत्सव संचालक आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर यांनी व्यक्त केले.

एआयमधील बदलांचा वेग प्रचंड आहे. तीन महिन्यांपूर्वी घेतलेला निर्णय पुढील तीन महिन्यांत बदलण्याची वेळ येऊ शकते. एखादा चित्रपट किंवा उत्पादन तयार करण्यासाठी सहा महिने लागतात; मात्र तोपर्यंत एआय तंत्रज्ञान अधिक प्रगत आणि दर्जेदार झालेले असते. त्याचे रिझोल्यूशन आणि सूक्ष्मताही सातत्याने वाढत आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा प्रवास नेमका कुठपर्यंत जाईल, हे सांगता येत नाही, असे गोवारीकर म्हणाले.

एआयच्या माध्यमातून तयार होणाऱ्या चित्रपटांच्या स्वामित्वहक्कांचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. जगभरातील सरकारे यासंबंधी नियमावली आणि कायदेशीर बाबींचा विचार करत आहेत. या प्रक्रियेतून सर्वांना मान्य होईल असा मार्ग निघेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

तंत्रज्ञानाला विरोध न करता स्वीकारण्याची गरज

नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची प्रक्रिया चित्रपटसृष्टीसाठी नवीन नाही. मायक्रोसॉफ्ट वर्डमधील स्पेल चेक सुविधेमुळे प्रूफरीडिंगच्या कामाचे स्वरूप बदलले. मूकपटांमध्ये आवाज आला आणि कृष्णधवल चित्रपट रंगीत झाले, तेव्हाही सुरुवातीला विरोध झाला होता. मात्र, कालांतराने या बदलांचा स्वीकार करण्यात आला. त्यामुळे एआयकडेही बदलत्या काळातील तंत्रज्ञान म्हणून पाहिले पाहिजे, असे गोवारीकर यांनी सांगितले.

कथाकथनाचा आत्मा कायम राहणार

एआयमुळे चित्रपटांचा आशय आणि कथाकथनाचे महत्त्व कमी होणार नाही. ‘लंचबॉक्स’, ‘मसान’ आणि ‘होमबाउंड’सारखे आशयप्रधान चित्रपट भविष्यातही तयार होत राहतील. मात्र, नव्या तांत्रिक साधनांमुळे मिथके, कल्पनारम्य कथा आणि ‘चंदामामा’च्या गोष्टी अधिक व्यापक स्वरूपात पडद्यावर साकारण्याची संधी उपलब्ध होईल. ‘महाभारत’ आणि ‘कृष्णगाथा’सारख्या कथा नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक प्रभावीपणे मांडता येतील. भविष्यात चित्रपट कोणत्या तंत्रज्ञानातून तयार झाला, यापेक्षा त्याची कथा अधिक महत्त्वाची ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा –  अमेरिकेत विमान समुद्रात कोसळले; एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

इफ्फीमध्ये तीन नव्या श्रेणींचा समावेश

यंदाच्या इफ्फीमध्ये अॅनिमेशन, माहितीपट आणि चित्रपटांवरील चित्रपट अशा तीन नव्या श्रेणी सुरू करण्यात आल्या आहेत. मास्टरक्लासमध्येही काही नवीन विषयांचा समावेश करण्यात आला. सबटायटलिंगवर प्रथमच स्वतंत्र मास्टरक्लास आयोजित करण्यात आला. भाषांतरादरम्यान मूळ आशयातील काही गोष्टी हरवू शकतात. त्यामुळे सबटायटलिंग हा चित्रपट महोत्सवातील महत्त्वाचा विषय असल्याचे गोवारीकर यांनी सांगितले.

महोत्सवाबाबत रसिकांनी टीकात्मक मते आणि सूचना मांडल्यास त्यांचे स्वागत केले जाईल. त्यानुसार आवश्यक सुधारणा करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महोत्सव संचालक म्हणून अनुभव समाधानकारक

इफ्फीचे महोत्सव संचालक म्हणून पहिल्यांदाच जबाबदारी सांभाळण्याचा अनुभव आनंददायी असल्याचे गोवारीकर यांनी सांगितले. प्रिव्ह्यू कमिटीसोबत चित्रपट निवडण्याची प्रक्रिया अनुभवली. आंतरराष्ट्रीय आणि भारतीय चित्रपटांचा व्यापक आवाका प्रतिनिधींना पाहता यावा, यासाठी चित्रपटांची निवड आणि मांडणी करण्यावर भर देण्यात आला. ‘धुरंधर’सोबत लडाखी भाषेतील ‘बिकमिंग’सारख्या चित्रपटालाही महत्त्व देण्यात आले. विविध भाषांतील चित्रपटांना इफ्फीमध्ये स्थान देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group