५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी जरांगेंचा गंभीर आरोप; एसआयटीला क्लिप दिली, सोर्स देण्यास नकार
रामदास कदम यांच्या चौकशीची मागणी; सरकारकडून पैसे घेणाऱ्यांची नावे दीड महिन्यात उघड करणार असल्याचा जरांगेंचा दावा

जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या घरी ५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीचे पथक दाखल झाले. या पथकाने जरांगे यांच्याकडून संबंधित ऑडिओ क्लिप घेतली. मात्र, क्लिपचा मूळ सोर्स देण्यास त्यांनी नकार दिला. सोर्स उघड केल्यास संबंधित व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्या व्यक्तीच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
एसआयटीचे पाटील आणि त्यांचे पथक क्लिप घेण्यासाठी आले होते. यावेळी जबाब नोंदवण्याची प्रक्रिया नव्हती, मात्र क्लिप स्वीकारण्याची प्रक्रिया बराच वेळ सुरू होती, असे जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. क्लिपचा सोर्स देणे शक्य नसल्याचे आपण अधिकाऱ्यांना स्पष्ट केले. सरकारने संबंधित व्यक्तीच्या जीविताची जबाबदारी घेतल्यासच सोर्सबाबत विचार करता येईल, असेही ते म्हणाले.
रामदास कदम यांच्या चौकशीची मागणी
या प्रकरणात रामदास कदम यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जरांगे यांनी केली. माझ्याआधी रामदास कदम यांनी ही क्लिप वाजवली होती. त्यामुळे मला क्लिप देणारी आणि त्यांना क्लिप देणारी व्यक्ती एकच असण्याची शक्यता आहे. त्यांना ही क्लिप कोणी दिली, याचीही चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला असून, मराठा समाजाच्या विरोधात मोठा डाव आखण्यात आला होता, असा आरोप जरांगे यांनी केला. आंदोलन मोडून काढण्यासाठी आणि आपली बदनामी करण्यासाठी नियोजन केले जात होते. यामुळे गेल्या तीन वर्षांपासून आपल्याला त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. कथित ऑडिओ संभाषणात शरद पवार, टोपे आणि भाजपच्या पार्टी फंडाचा उल्लेख असल्याचा दावाही त्यांनी केला.
हेही वाचा – पुण्यातील न्यायालय परिसरातील हल्ल्याची गृहराज्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे आदेश
सरकारकडून पैसे घेतल्याचा आरोप
आपल्या प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित केले जात असल्याबद्दल जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली. सरकारचे पैसे घेऊन आपल्या मुलांना अन्न खाऊ घालायचे नाही, असे सांगत आंदोलनाच्या विरोधात बोलण्यासाठी काही जणांना पैसे दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारकडून पैसे घेतल्याशिवाय कोणीही आंदोलनाच्या विरोधात बोलत नाही, असेही ते म्हणाले.
आपल्याला मदत करणारे काही मंत्री आणि आमदार यांच्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाचे पुरावे आपल्याकडे येत असल्याचा दावा करत, सरकारकडून कोणी पैसे घेतले, यांची नावे पुढील दीड महिन्यात समोर आणणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.
राजकीय करिअर बरबाद करण्याचा इशारा
मराठा समाजाने मोठे केलेली व्यक्तीच आता समाजातील तरुणांचे नुकसान करण्यासाठी पुढे आली असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. पदाचा गैरवापर करून तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी त्यांनी संबंधितांना उद्देशून, “माझ्या नादाला लागू नको, शहाणा हो. माझी पहिलीच राख झालेली आहे. तुझं राजकीय करिअर बरबाद करू नको,” असा इशारा दिला. आता आपली भीती संपली असल्याचेही ते म्हणाले.
काय आहे ५०० कोटींचे कथित ऑडिओ क्लिप प्रकरण?
मनोज जरांगे यांनी बीडमधील नारायणगड येथे दसरा मेळाव्यात मराठा आरक्षण आंदोलन कमकुवत करण्यासाठी ५०० कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली होती.
जरांगे यांनी ऐकवलेल्या कथित क्लिपमध्ये भाजपकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ५०० कोटी रुपये देण्यात आले आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून ही रक्कम मनोज जरांगे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्याचा उल्लेख असल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच जरांगे यांचे आंदोलन रोखण्यासाठी आणि त्यांना बदनाम करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे संभाषणात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आपल्याला कोणतेही पैसे मिळाले नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले होते.
या कथित ऑडिओ क्लिपची सत्यता तपासण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली. सध्या या पथकाकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे.




