Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील न्यायालय परिसरातील हल्ल्याची गृहराज्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे आदेश

मंदार किवळे हल्ला प्रकरणातील सर्व संशयितांना अटक; आरोपींची पार्श्वभूमी आणि गुन्हेगारी इतिहास तपासण्याचे निर्देश – योगेश कदम

पुणे : शिवाजीनगर सत्र न्यायालय परिसरात मंदार मारुती किवळे (वय ३५) याच्यावर झालेल्या हल्ल्याची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणातील सर्व संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या पार्श्वभूमीची आणि यापूर्वीच्या गुन्हेगारी नोंदींची माहिती मागवण्यात आली आहे. पुण्यासह राज्यातील कोणत्याही शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.

शिवाजीनगर सत्र न्यायालयासमोरील रस्त्यावर २५ नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास ही घटना घडली. दोन दुचाकींवरून आलेल्या सहा जणांनी मंदार किवळे याच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला; मात्र पिस्तुलातून गोळी न सुटल्याने गोळीबार झाला नाही. त्यानंतर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे न्यायालय परिसरात खळबळ उडाली होती.

या प्रकरणी पत्रकार परिषदेत बोलताना योगेश कदम म्हणाले की, हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यापैकी कोणाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग होता, याचा तपास सुरू आहे. हल्ल्यामागील नेमके कारण चौकशीनंतर स्पष्ट होईल. संबंधित तरुण कुठून आले होते, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, यापूर्वी त्यांच्यावर गुन्हे दाखल होते का आणि त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती का, याची माहिती मागवण्यात आली आहे.

हेही वाचा –  पॅकेज्ड पाणी आणि मिनरल वॉटरची देशभर तपासणी; FSSAI ची विशेष मोहीम सुरू

गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा

पुणे किंवा महाराष्ट्रातील अन्य शहरांमध्ये काही जण स्वतःची दहशत निर्माण करून गुंडगिरीचे प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कोणतीही दयामाया न दाखवता कठोर कारवाई करावी. आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक कारवाईही करावी, असे स्पष्ट निर्देश सर्व पोलीस युनिट प्रमुखांना देण्यात आले आहेत, असे कदम यांनी सांगितले.

पुणे पोलिसांनी मागील सहा महिन्यांत मकोका आणि एमपीडीए अंतर्गत कारवाया केल्या आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली आहे. मात्र, अशा घटना घडू नयेत यासाठी कारवाई अधिक तीव्र करण्याची आवश्यकता आहे. पोलिसांचा धाक काय असतो, हे दिसले पाहिजे, अशा सूचना पोलिसांना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अवैध शस्त्रे शहरात येत असल्याच्या मुद्द्यावरही पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक होऊन अद्याप २४ तासही पूर्ण झालेले नसल्याने चौकशी सुरू आहे. तपास पूर्ण होण्यापूर्वी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे योग्य ठरणार नाही, असेही योगेश कदम यांनी नमूद केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group