Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मुंबईतील मैदाने, उद्याने खासगी संस्थांच्या ताब्यात जाणार नाहीत; महापालिकाच करणार विकास

२०२३ चा धोरण मसुदा रद्द करण्याचे आशिष शेलार यांचे निर्देश; सीएसआर निधीतून विकास आणि देखभालीचे नियोजन

मुंबई : मुंबईतील मैदाने आणि उद्याने खासगी संस्थांच्या ताब्यात न देता महापालिकेनेच त्यांचा विकास आणि देखभाल करावी, असे स्पष्ट निर्देश मुंबईचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. यासाठी मुंबई महापालिकेने २०२३ मध्ये तयार केलेला धोरणाचा मसुदा मागे घेण्याचे आदेशही देण्यात आले.

मंत्रालयात झालेल्या बैठकीला महापौर रितू तावडे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. मुंबईतील मैदाने आणि उद्याने ही नागरिकांच्या हक्काची असून ती सर्वांसाठी खुली राहिली पाहिजेत, अशी भूमिका या बैठकीत मांडण्यात आली.

मुंबईत सध्या १,१२३ खेळाची मैदाने आणि ३४३ उद्याने आहेत. त्यापैकी १,१०८ मैदाने महापालिकेने विकसित केली आहेत, तर १५ मैदाने खासगी संस्थांना ११ महिन्यांच्या करारावर देखभालीसाठी देण्यात आली आहेत. तसेच ३४३ उद्यानांपैकी ३३६ उद्यानांची देखभाल महापालिका करते, तर सात उद्याने खासगी संस्थांकडे आहेत. जुन्या धोरणानुसार खासगी संस्थांना दिलेल्या ११ मैदानांचे काळजीवाहू आणि १८ मैदानांचे दत्तक करार संपल्याची माहिती आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली.

हेही वाचा –  शेतकऱ्यांना तीन महिने मोफत धान्य; नर्मदा-तापी वळण योजनेसाठी ५,५४८ कोटींची तरतूद

मैदाने आणि उद्यानांच्या देखभालीसाठी निधी व मनुष्यबळ अपुरे असल्याचे आयुक्तांनी बैठकीत सांगितले. मात्र, सीएसआर निधीतून आवश्यक निधी उभारता येऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची सूचना मंगलप्रभात लोढा यांनी केली.

२०२३ मध्ये तयार केलेला आणि शासनाच्या मंजुरीसाठी पाठवलेला धोरण मसुदा मागे घेऊन त्याबाबत संबंधित विभागाला लेखी कळवावे, असे निर्देश शेलार यांनी दिले. पहिल्या टप्प्यात निवडक मैदानांचा आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विकास करावा. त्यात विविध खेळांसाठी सुविधा, चालण्यासाठी आणि जॉगिंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर मैदानांचाही विकास करावा, असे त्यांनी सांगितले.

या उपक्रमासाठी सीएसआर निधी मिळविण्याच्या दृष्टीने महापालिकेने सार्वजनिक आवाहन करून त्याला व्यापक प्रसिद्धी द्यावी, असेही शेलार यांनी सुचविले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group