TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

शेतकऱ्यांना तीन महिने मोफत धान्य; नर्मदा-तापी वळण योजनेसाठी ५,५४८ कोटींची तरतूद

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत १३ महत्त्वाचे निर्णय; आर्थिक फसवणूक प्रकरणांचा ९० दिवसांत निपटारा, अनुदानित शाळांसाठी स्वतंत्र कायद्याचा मार्ग मोकळा

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत शेतकरी, विद्यार्थी, शिक्षक, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील ३३ जिल्ह्यांमधील ४२ लाख ३० हजार ७८३ शेतकऱ्यांना पुढील तीन महिने मोफत धान्य देण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा-तापी वळण योजनेसाठी ५ हजार ५४८ कोटी रुपयांच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली. आर्थिक फसवणूक प्रकरणांचा ९० दिवसांत निपटारा करण्यासाठी स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापन करण्यासह एकूण १३ महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले.

शेतकऱ्यांना तीन महिने मोफत धान्य

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील दारिद्र्यरेषेखालील, मात्र थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेत समाविष्ट नसलेल्या ३३ जिल्ह्यांतील ४२ लाख ३० हजार ७८३ शेतकऱ्यांना पुढील तीन महिने मोफत धान्य मिळणार आहे. प्रत्येक व्यक्तीला दरमहा पाच किलो धान्य दिले जाणार असून, त्यामध्ये तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गव्हाचा समावेश असेल.

नर्मदा-तापी वळण योजनेसाठी ५,५४८ कोटी

नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा-तापी वळण योजनेसाठी ५ हजार ५४८ कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली. या योजनेअंतर्गत सहा वळण बंधाऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे परिसरातील सुमारे २६ हजार ५२६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार असून, ११.५० मेगावॅट वीज निर्मितीही होणार आहे.

आर्थिक फसवणूक प्रकरणांचा ९० दिवसांत निपटारा

आर्थिक फसवणूक करणाऱ्या संस्थांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया अधिक जलद करण्यासाठी स्वतंत्र एमपीआयडी न्यायाधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या न्यायाधिकरणामार्फत संबंधित प्रकरणांचा ९० दिवसांच्या आत निपटारा करण्याची कालमर्यादा निश्चित केली जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमात सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली.

हेही वाचा –  पुणेकरांच्या सुरक्षिततेशी तडजोड नाही; गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणार : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

महसूल न्यायालयीन कामकाजात डिजिटल प्रणाली

महसूल विभागातील अर्धन्यायिक कामकाजासाठी महसूल न्यायालय दावा व्यवस्थापन प्रणाली (रेव्हेन्यू कोर्ट केस मॅनेजमेंट सिस्टीम) लागू करण्यात येणार आहे. तसेच प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ‘एक जिल्हा, एक अपील’ ही तरतूद लागू केली जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली.

आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना वाढीव भत्ता

आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईबीसी), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातील आरोग्य विज्ञान व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत सुधारित दराने भत्ता मिळणार आहे. भोजन, निवास आणि निर्वाह भत्त्यात वाढ करण्यास मान्यता देण्यात आली.

शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक सुविधा

शालार्थ प्रणालीत समाविष्ट असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी रिझर्व्ह बँकेकडे नोंदणीकृत संस्थांच्या माध्यमातून वित्तीय सुविधा उपलब्ध होतील.

मुद्रांक शुल्कविषयक तरतुदींमध्ये सुधारणा

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम ३२ (ब) आणि ५३ (१अ) मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यासंदर्भातील विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात सादर केले जाणार आहे. या सुधारणांमुळे अभिनिर्णय शुल्क आणि अपील शुल्काच्या दरांमध्ये सुसूत्रता येणार आहे.

दोन विद्यापीठांच्या अधिनियमांत सुधारणा

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक अधिनियम, १९९७ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अधिनियम, १९८९ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. कुलसचिव नियुक्ती, परिनियम, वित्त व लेखा समिती, इमारत बांधकाम समिती, वार्षिक अहवाल आणि लेखे यासंदर्भातील तरतुदींमध्ये एकसमानता आणण्याचा या सुधारणांचा उद्देश आहे.

खासगी अनुदानित शाळांसाठी स्वतंत्र कायदा

खासगी अनुदानित शाळांच्या विनियमनासाठी सर्वसमावेशक कायदा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी ‘महाराष्ट्र खाजगी अनुदानित शाळा (विनियमन) विधेयक, २०२६’ या विधेयकाच्या प्रारूपास मंजुरी देण्यात आली. हे विधेयक विधिमंडळात सादर केले जाणार आहे.

माथाडी आणि सुरक्षा रक्षक कायद्यांत सुधारणा

महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ आणि महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१ या दोन्ही कायद्यांमध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

अॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीबाबत सुधारणा

राष्ट्रीय सहयोगी आणि आरोग्यसेवा व्यवसाय आयोग अधिनियम, २०२१ (एनसीएएचपी कायदा) मधून अॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धती वगळण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक सुधारणा करणाऱ्या विधेयकाच्या प्रारूपास मान्यता देण्यात आली.

खासगी अनुदानित आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांतील ग्रंथपालांना सातवा वेतन आयोग

शासकीय वैद्यकीय, दंत आणि आयुर्वेद महाविद्यालयांतील पूर्णवेळ ग्रंथपालांप्रमाणेच आता खासगी अनुदानित आयुर्वेद आणि युनानी महाविद्यालयांतील ग्रंथपालांनाही सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार सुधारित वेतन संरचना लागू करण्यास मंजुरी देण्यात आली.

लोकसेवा हक्क अधिनियमात सुधारणा

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ मधील तरतुदींमध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यासंदर्भातील सुधारणा अधिनियम विधिमंडळासमोर मांडण्यात येणार आहे.

मौदा नगर पंचायतीला शासकीय जमीन

नागपूर जिल्ह्यातील मौदा नगर पंचायतीला शासकीय जमीन देण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे नगर पंचायतीच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group