पाच हजारांची अग्रीम रक्कम आणि नमो शेतकरी योजना एकच आहे का?
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विधानामुळे संभ्रम; नमो शेतकरी योजनेचा निधी देण्याचा प्रस्ताव अर्थ खात्याकडे पाठविल्याची माहिती

नांदेड : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने दिवाळीपूर्वी प्रति शेतकरी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार काही शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली असून, अद्याप काही शेतकरी लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नमो शेतकरी सन्मान योजना आणि पाच हजार रुपयांची अग्रीम रक्कम याबाबत केलेल्या विधानामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना नांदेड विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीबाबत भूमिका स्पष्ट केली. “आता जी पाच हजार रुपयांची रक्कम प्रति शेतकऱ्याला दिली आहे, शेवटी रक्कम तीच आहे. ती काही वेगळी रक्कम नाही. मात्र, शेतकऱ्यांना नमो योजनेचेही पैसे देणार आहोत. ते पैसे देणार नाही, असे काही नाही. त्यासंदर्भातील प्रस्ताव अर्थ खात्याकडे पाठवला आहे,” असे भरणे यांनी सांगितले.
हेही वाचा – पंजाबमध्ये भाजप-अकाली दलाची युती पुन्हा; मुख्यमंत्रीपद अकाली दलाकडे!
यावर पत्रकारांनी पाच हजार रुपयांची अग्रीम रक्कम ही नमो शेतकरी योजनेतूनच दिली आहे का, असा थेट प्रश्न विचारला. त्यावर भरणे यांनी, “असं म्हणता येणार नाही,” असे उत्तर दिले. त्यामुळे अग्रीम मदत आणि नमो शेतकरी सन्मान योजनेच्या हप्त्याबाबत नेमकी स्थिती काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शेतकऱ्यांमध्ये संभ्रम
दुष्काळामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदतीचे आश्वासन दिले होते. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असेही सरकारकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर पाच हजार रुपयांची अग्रीम रक्कम देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, काही शेतकऱ्यांना अद्याप ही मदत मिळालेली नाही. आता कृषिमंत्र्यांच्या विधानामुळे पाच हजार रुपयांची मदत आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ या दोन्हींचे स्वरूप व वितरण याबाबत स्पष्टता मिळण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.




