जत्रेतील दूषित चाऊमीनमुळे १३० जणांना अन्नविषबाधा! ११८ मुले आणि १२ प्रौढ आजारी

Balaghat Food Poisoning | मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील हिर्री गावात २१ नोव्हेंबर रोजी भरलेल्या जत्रेत दूषित चाऊमीन (नूडल्स) खाल्ल्याने किमान ११८ मुले आणि १२ प्रौढ अशा एकूण १३० जणांना संशयित अन्नविषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री जत्रेत नूडल्स खाल्ल्यानंतर अनेकांची प्रकृती अचानक बिघडली, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
बालाघाटचे जिल्हाधिकारी आदित्य सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाधित रुग्णांना तातडीने किरणापूर येथील सामूहिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. आजारी पडलेल्या ११८ मुलांपैकी ७३ मुलांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, तर ४५ मुलांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधांसाठी बालाघाट जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याशिवाय १२ प्रौढांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने तेथे उपचार घेणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ५७ झाली आहे.
जिल्हाधिकारी सिंह आणि मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ. शत्रुघ्न सिंह दहिया यांनी रविवारी सकाळी रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. सध्या जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या सर्व ४५ मुलांची आणि १२ प्रौढांची प्रकृती सामान्य व स्थिर असून ते धोक्याबाहेर असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा
राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’; मंत्री आदिती तटकरे
संशयित स्टॉल्स जप्त; अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत
स्थानिक पातळीवर ‘मडई’ म्हणून ओळखली जाणारी ही जत्रा किरणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरवण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने या प्रकरणाशी संबंधित संशयित खाद्यपदार्थांचे स्टॉल्स जप्त केले आहेत, तसेच अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. हे अन्न नेमके कशामुळे दूषित झाले, याचा तपास प्रशासन आणि पोलिसांकडून सुरू आहे.
आरोग्य यंत्रणेच्या त्रुटी पुन्हा ऐरणीवर
बालाघाट जिल्ह्यात बाल आरोग्याबाबत आधीच गंभीर चिंता व्यक्त केली जात असताना ही घटना घडली असून, जून महिन्यापासून जिल्ह्यातील आदिवासीबहुल भागात ३२ मुलांचा मृत्यू झाला आहे; या मृत्यूंची केंद्र सरकारच्या ‘नॅशनल जॉइंट आउटब्रेक रिस्पॉन्स टीम’ने (NJORT) चौकशी केली असता विशेषतः बिरसा तालुक्यात रोग निगराणी, प्रयोगशाळा सुविधा, लसीकरणाच्या नोंदी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याचे आढळून आले होते, तसेच या पथकाने कुपोषणाचे प्रमाण आणि आरोग्य आणीबाणीला तोंड देण्यातील यंत्रणेच्या कमकुवतपणाकडेही लक्ष वेधले होते.




