‘दृश्यम: द कनक्लुजन’ ओटीटीवर येणार! नेटफ्लिक्सने केली प्रदर्शनाची अधिकृत घोषणा

Drishyam 3 OTT Release Date | ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम २’ प्रमाणेच अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेल्या ‘दृश्यम: द कनक्लुजन’ (दृश्यम ३) या चित्रपटालाही प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. २ ऑक्टोबर २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ५८९.२६ कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली आहे. आता थिएटरमधील यशस्वी घोडदौडीनंतर हा सिनेमा ओटीटीवर (OTT) येण्यासाठी सज्ज झाला आहे.
दिग्दर्शक अभिषेक पाठक यांचा हा बहुचर्चित थ्रिलर चित्रपट ‘नेटफ्लिक्स’ (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सने याबाबत अधिकृत घोषणा केली असून, येत्या २७ नोव्हेंबर २०२६ रोजी हा सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी हा चित्रपट ओटीटीवर येत आहे.
हेही वाचा
युझवेंद्र चहलची राजकारणात एन्ट्री! भारतीय जनता पक्षात प्रवेश करत स्वीकारली नवी जबाबदारी
अभिषेक पाठक, आमिल कीयान खान आणि परवेज शेख यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. यामध्ये अजय देवगण पुन्हा एकदा ‘विजय साळगांवकर’च्या भूमिकेत असून, आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी तो पोलिसांच्या जाळ्यातून कसा सुटतो आणि पोलीस त्याचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी काय शक्कल लढवतात, याचा थरार यात पाहायला मिळतो. अजय देवगणसोबत या सिनेमात तब्बू, श्रिया सरन, जयदीप अहलावत, इशिता दत्ता, रजत कपूर, मृणाल जाधव आणि प्रकाश राज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
सॅल्कनिकच्या अहवालानुसार या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली असून, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी भारतात ६२ कोटी रुपये आणि पहिल्या आठवड्यात २४५.५० कोटी रुपयांची कमाई केली; तसेच ५० दिवसांत भारतात अंदाजे ३८०.९५ कोटींचा टप्पा गाठत भारतातील एकूण कमाई ४५६.०६ कोटी रुपयांवर नेली, तर परदेशातील १३३.२० कोटी रुपयांच्या कमाईसह या सिनेमाने जगभरात एकूण ५८९.२६ कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन केले आहे.




