भाजपाचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन!
दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास; खासदार झाल्यानंतर अवघ्या ८ महिन्यांतच काळाचा घाला

मुंबई | भाजपाचे राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांना छातीत दुखू लागल्याने दिल्लीतल्या एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. विधान परिषद आमदार महादेव जानकर यांनीही पोस्ट लिहून त्यांना आदरांजली वाहिली आहे.
रामराव वडकुते यांची रविवारी पहाटे अचानक प्रकृती बिघडली होती. त्यांना अस्वस्थ वाटत होतं. यामुळे त्यांना तातडीने रग्णालयात दाखल केलं होतं. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समजत आहे. ते ३ एप्रिल २०२६ रोजी महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार बनले होते. खासदार झाल्यानंतर अवघ्या आठ महिन्यातच ही दु:खद घटना घडली.
हेही वाचा
‘वायसीएम’च्या औषधपुरवठ्यावर दरवर्षी श्वेतपत्रिका काढा, महापौर रवि लांडगे यांचे आदेश
आठ महिन्यापूर्वीच भाजपकडून रामराव वडकुते यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं होतं. अत्यंत प्रगल्भ आणि निष्कलंक राजकारणी म्हणून त्यांची ओळख होती. राज्यसभा खासदार रामराव वडकुते हे पूर्वी शेळी मेंढी महासंघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज पाहिला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते होते आणि त्यांनी पक्षाच्या कोट्यातून महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम केले आहे.ऑक्टोबर २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला. धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे भाजपा निवडणूक प्रमुख आणि प्रभारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.




