नगरसेवक विनोद नढे यांच्या पत्राचा दणका । अजय सूर्यवंशींकडील पाणीपुरवठा विभागाचा अतिरिक्त पदभार काढला!
शहर अभियंता मनोज सेठिया यांच्याकडे विभागप्रमुखपद कायम, कथित अनियमिततेच्या चौकशीची मागणी

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांच्याकडील पाणीपुरवठा विभागाचा अतिरिक्त पदभार आयुक्तांच्या आदेशाने काढून घेण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागामार्फत हा आदेश जारी करण्यात आला असून, शहर अभियंता मनोज सेठिया यांच्याकडे पाणीपुरवठा विभागाचे विभागप्रमुख म्हणून असलेली जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. नगरसेवक विनोद नढे यांनी विभागाच्या कामकाजावर आक्षेप घेत आयुक्तांना पत्र दिल्यानंतर हा आदेश जारी झाला.
नढे यांनी ३ नोव्हेंबर २०२६ रोजी महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात पाणीपुरवठा विभागातील निविदा प्रक्रिया, कामांना दिलेल्या मंजुऱ्या आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते. सुमारे १९ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या कथित प्रकरणाचाही त्यांनी पत्रात उल्लेख केला. या प्रकरणासह निविदा आणि कामांच्या मंजुरीतील कथित अनियमिततेची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. संबंधित अधिकाऱ्यांना अतिरिक्त विभागीय जबाबदारी देण्याबाबतही त्यांनी आक्षेप नोंदवला होता.
हेही वाचा – २४ कोटींच्या शालेय साहित्य खरेदीवर चेतन पवारांचा हल्लाबोल!
निविदा आणि कामांच्या मंजुरीची चौकशी करण्याची मागणी
महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता असावी, जनतेच्या पैशांचा विनियोग नियमानुसार व्हावा आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, ही आपली भूमिका असल्याचे नढे यांनी स्पष्ट केले. अतिरिक्त पदभाराबाबत प्रशासनाने निर्णय घेतल्यानंतर आता नढे यांनी उपस्थित केलेल्या आरोपांची स्वतंत्र चौकशी होणार का आणि चौकशीत अनियमितता आढळल्यास प्रशासन कोणती कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.




