ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कामशेतच्या पॅराग्लायडिंगला दिलासा, वीजवाहिनीचा मार्ग बदलण्याचे आदेश

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याला यश

– ‘टॉवर हिल’च्या मुख्य उड्डाण क्षेत्राला अडथळा येऊ न देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

मावळ, पुणे | प्रतिनिधी

मावळ तालुक्यातील कामशेतच्या ‘टॉवर हिल’वरील पॅराग्लायडिंगला दिलासा मिळाला आहे. मुख्य उड्डाण क्षेत्रातून जाणाऱ्या प्रस्तावित वीजवाहिनीचा मार्ग बदलण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत दिल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. वीजवाहिनीच्या कामामुळे पॅराग्लायडिंगला कोणत्याही परिस्थितीत अडथळा येऊ नये, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे बारणे यांनी सांगितले.

प्रस्तावित वीजवाहिनीच्या तीन खांबांमुळे ‘टॉवर हिल’च्या मुख्य उड्डाण क्षेत्रात अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती. कामशेत पॅराग्लायडिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार बारणे यांची भेट घेऊन वीजवाहिनीचा मार्ग बदलण्याची मागणी केली होती. त्यानंतर बारणे यांनी केंद्रीय विद्युत मंत्रालयाचे सचिव पंकज अग्रवाल यांच्याकडे हा प्रश्न मांडला. तीन खांबांसाठी गेल्या ३० वर्षांपासून सुरू असलेला साहसी क्रीडा प्रकार बंद पडू नये, यासाठी खांब उड्डाण क्षेत्राबाहेर उभारण्याचा पर्याय त्यांनी सुचविला होता. त्यावर संबंधित कंपनीशी चर्चा करून फेरसर्वेक्षण करण्याचे आणि खांब बाजूने नेण्याचे निर्देश अग्रवाल यांनी दिले होते.

हेही वाचा –  महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या ३१० वर; आणखी सहा तालुक्यांचा समावेश

जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीला कामशेत पॅराग्लायडिंग असोसिएशनचे अध्यक्ष संजय एम. राव, उपाध्यक्ष विनोद शेलार आणि वीजवाहिनीचे काम करणाऱ्या अदानी पॉवरचे अधिकारी उपस्थित होते.
उड्डाण प्रशिक्षणासह स्थानिक व्यवसायांनाही दिलासा

‘टॉवर हिल’वर दरवर्षी हजारो देशी-विदेशी पर्यटक आणि शेकडो प्रशिक्षणार्थी वैमानिक येतात. सप्टेंबर ते मार्च या पूर्वेकडील वाऱ्यांच्या हंगामात उड्डाणांसाठी या ठिकाणाला व्यवहार्य पर्याय उपलब्ध नसल्याचे बारणे यांनी सांगितले. पॅराग्लायडिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांवर स्थानिक वाहतूक सेवा, होमस्टे, कॅफे आणि उपाहारगृहांचा व्यवसायही अवलंबून आहे. त्यामुळे वीजवाहिनीचा मार्ग बदलण्याच्या निर्णयाने वैमानिक आणि प्रशिक्षण संस्थांसह स्थानिक व्यावसायिकांनाही दिलासा मिळणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“गेल्या तीन दशकांपासून कामशेत हे भारतातील प्रमुख पॅराग्लायडिंग स्थळ म्हणून ओळखले जाते. येथे मनोरंजनात्मक उड्डाणे, व्यावसायिक टँडम उड्डाणे, वैमानिक प्रशिक्षण तसेच स्पर्धात्मक विमान क्रीडा उपक्रम चालतात. देशभरातील वैमानिक घडवण्यासाठी हे एक महत्त्वाचे प्रशिक्षण केंद्र आहे.”

— श्रीरंग बारणे, खासदार

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group