पुण्यातील खाऊ गल्ल्यांवर FDAची धडक कारवाई; ८ दुकानांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा!
जंगली महाराज रस्त्यावरील १७ खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची तपासणी; परवाना नसलेल्या दुकानांवर प्रत्येकी ३० हजारांचा दंड प्रस्तावित, सहा जणांचे परवाने निलंबित

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध खाऊ गल्ल्यांमधील खाद्यपदार्थांचा दर्जा आणि स्वच्छता तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) विशेष मोहीम हाती घेतली आहे. जंगली महाराज रस्त्यावरील खाऊ गल्लीत FDAच्या पथकाने तपासणी करून एकूण १७ खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची पाहणी केली. यावेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे.
जंगली महाराज मंदिरासमोर तसेच एन.सी.आर. हॉटेल परिसरात ही तपासणी मोहीम राबवण्यात आली. तपासणीदरम्यान आठ दुकानांकडे अन्न व्यवसायासाठी आवश्यक असलेला वैध परवाना किंवा नोंदणी नसल्याचे आढळले. त्यामुळे या दुकानांना तातडीने व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक आस्थापनावर ३० हजार रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
परवाना नसलेल्या दुकानांवर कारवाई
FDAच्या तपासणीत श्रीनाथ पिझ्झा अँड सँडविचेस, राज चायनीज फास्ट फूड, हिंदवी स्वराज्य, एव्हरेस्ट मोमोज, जय मल्हार भुर्जी सेंटर, शोरमा सेंटर, उत्कर्ष मंडळ लव्ह ज्यूस पॉईंट आणि साई ज्यूस, मिल्कशेक अँड सरबत सेंटर या दुकानांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमधील विकासकामांना २० कोटींचे आर्थिक बळ!
स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांनाही नोटिसा
याशिवाय स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुमित कुमार, जे. एम. वडापाव स्नॅक्स, हॅप्पी फॅमिली रेस्टॉरंट, श्री सद्गुरू हिंदवी स्वराज्य स्पेशल तुपातील साबुदाणा वडे, जे. एम. पावभाजी कॉर्नर आणि श्री कृष्णा दिल्ली चाट अँड पाणीपुरी सेंटर या दुकानांवरही कारवाई करण्यात आली आहे. तसेच सहा जणांचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.
यापूर्वी वैशाली आणि रूपालीवरही कारवाई
दरम्यान, यापूर्वी FDAने पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील फर्ग्युसन कॉलेज (एफ.सी.) रस्त्यावरील प्रसिद्ध वैशाली आणि रूपाली रेस्टॉरंटवरही कारवाई केली होती. अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचे गंभीर उल्लंघन आढळल्याने या दोन्ही रेस्टॉरंटचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले होते.
खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी वैध परवाने, स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. FDAच्या या मोहिमेमुळे पुण्यातील खाऊ गल्ल्यांमधील खाद्यपदार्थांच्या गुणवत्ता आणि स्वच्छतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.




