वाकड मेट्रोपर्यंत थेट बससेवा सुरू करा; माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांची आग्रही मागणी
रहाटणी, पिंपळे सौदागर आणि पिंपळे गुरवसाठी पीएमपीएमएल बसची मागणी

मार्गाची पाहणी, प्रवासी सर्वेक्षण आणि कार्यालयीन वेळेत अधिक फेऱ्यांवर भर
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
रहाटणी, पिंपळे सौदागर आणि पिंपळे गुरव येथून वाकड मेट्रो स्थानकापर्यंत थेट आणि नियमित पीएमपीएमएल बससेवा सुरू करावी, अशी आग्रही मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी केली आहे. प्रस्तावित मार्गाची तातडीने पाहणी करून प्रवासी संख्येचे सर्वेक्षण करावे आणि सकाळ-संध्याकाळच्या कार्यालयीन वेळेत पुरेशा बसफेऱ्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो सेवा सुरू झाल्याने हिंजवडी आयटी पार्कमध्ये कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. मात्र, या तीन भागांतून वाकड मेट्रो स्थानक गाठण्यासाठी नियमित आणि थेट बससेवा नसल्याने प्रवाशांना दुचाकी, खासगी वाहने किंवा इतर वाहतूक पर्यायांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे कार्यालयीन वेळेत रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण वाढतो आणि प्रवाशांचा वेळ व खर्चही वाढतो, याकडे काटे यांनी लक्ष वेधले.
हेही वाचा
महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि नियमित प्रवासाची गरज
रहाटणी, पिंपळे सौदागर आणि पिंपळे गुरव परिसरातून दररोज मोठ्या संख्येने आयटी कर्मचारी हिंजवडीला ये-जा करतात. त्यात महिला कर्मचाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे बसचे वेळापत्रक कार्यालयीन वेळांशी जुळवून नियमित फेऱ्या दिल्यास मेट्रोपर्यंतचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि परवडणारा होईल, अशी भूमिका काटे यांनी मांडली.
वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर या परिसराला मेट्रोशी जोडणारी बससेवा ही सार्वजनिक वाहतुकीची गरज आहे. थेट बस उपलब्ध झाल्यास खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होऊन वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण आणि मार्गाची पाहणी करून बससेवा सुरू करण्याबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी काटे यांनी केली आहे.
“रहाटणी, पिंपळे सौदागर आणि पिंपळे गुरवमधील नागरिकांना वाकड मेट्रो स्थानक गाठण्यासाठी रोज खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते. या तिन्ही भागांतून स्थानकापर्यंत थेट पीएमपीएमएल बससेवा सुरू केल्यास आयटी कर्मचाऱ्यांचा वेळ आणि प्रवासखर्च वाचेल. विशेषतः महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि नियमित प्रवासाचा पर्याय मिळेल. पीएमपीएमएलने तातडीने मार्गाची पाहणी आणि प्रवासी सर्वेक्षण करून सकाळ-संध्याकाळच्या कार्यालयीन वेळेत पुरेशा बसफेऱ्या सुरू कराव्यात.”
– विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते, पिंपरी-चिंचवड महापालिका.




