आदित्य ठाकरेंसह शिवसेनेचे आमदार संतापले; मुंबई विद्यापीठात कुलगुरूंसोबत जोरदार खडाजंगी
आमदारांना गोडाऊनमध्ये बसवल्याचा आरोप; बैठकीत पोलीस उपस्थित ठेवल्याने वरुण सरदेसाई, अनिल परब आक्रमक, सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांना अपात्रतेची नोटीस

मुंबई : मुंबई विद्यापीठातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी कुलगुरूंची भेट घेण्यासाठी गेलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख नेते आणि आमदार चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आदित्य ठाकरे यांच्यासह गेलेल्या आमदारांना सुरुवातीला गोडाऊनमध्ये बसवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर बैठकीदरम्यान पोलिसांची उपस्थिती असल्याने आमदारांनी विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारला. या प्रकारामुळे कुलगुरू आणि आमदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे समोर आले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांना अपात्रतेसंदर्भात कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटिशीसह विद्यापीठाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आदित्य ठाकरे कुलगुरूंच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत आमदार अनिल परब, वरुण सरदेसाई, सुनील प्रभू, अजय चौधरी, सुनील शिंदे, महेश सावंत, बाळा नर, ज. मो. अभ्यंकर आणि मनोज जामसुतकर उपस्थित होते.
बैठकीत पोलिसांची उपस्थिती; वरुण सरदेसाईंचा सवाल
कुलगुरूंच्या भेटीपूर्वी आमदारांना बाहेरील गोडाऊनमध्ये बसवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. तसेच बैठकीच्या वेळी पोलिसांना बोलावण्यात आल्याने आमदारांनी नाराजी व्यक्त केली. वरुण सरदेसाई यांनी कुलगुरूंना याबाबत जाब विचारला.
“आम्ही जेव्हा जेव्हा विद्यापीठात तुम्हाला भेटायला येतो, तेव्हा पोलिसांना का बोलावले जाते? आम्ही काही अतिरेकी आहोत का?” अशा शब्दांत सरदेसाई यांनी संताप व्यक्त केला.
आमदार अनिल परब यांनीही पोलिसांच्या उपस्थितीवर आक्षेप घेतला. “तुमच्याशी चर्चा करायची असेल, तर आम्ही ती पोलिसांसमोर करायची का? आधी पोलिसांना इथून बाहेर काढा,” अशी मागणी त्यांनी केली.
हेही वाचा – अजित पवारांच्या अपघाताचा अहवाल लवकर द्या; दोषी आढळल्यास कठोर कारवाई करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गोडाऊनमध्ये बसवल्याच्या आरोपावरूनही नाराजी
आमदारांना गोडाऊनमध्ये बसवण्यात आल्याच्या मुद्द्यावरूनही विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. प्रशासनाने या प्रकाराची चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अनिल परब यांनी चौकशीच्या उत्तरावर नाराजी व्यक्त केली.
“आम्ही आमदार म्हणून सांगत आहोत की, ही घटना आमच्यासोबत घडली आहे. अशा वेळी चौकशी कसली करता? एखाद्या सुरक्षा रक्षकाने आमच्याशी चुकीचे वर्तन केले असते, तर त्याला जबाबदार कोण?” असा सवाल परब यांनी उपस्थित केला.
आमदार सुनील प्रभू यांनीही या प्रकाराला जबाबदार असलेल्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांना अपात्रतेची नोटीस
दरम्यान, ठाकरे गटाचे मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांना विद्यापीठाकडून अंतिम कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. प्रशासकीय गैरवर्तन, चुकीची आणि बदनामीकारक माहिती प्रसारित करणे, जबरदस्तीने अतिक्रमण करणे तसेच मुंबई विद्यापीठाची प्रतिष्ठा आणि संस्थात्मक विश्वासार्हतेला हानी पोहोचवणाऱ्या कथित कृतींचा उल्लेख या नोटिशीत करण्यात आल्याची माहिती आहे.
या नोटिशीवरून आणि विद्यापीठातील अन्य प्रश्नांवरून आदित्य ठाकरे व त्यांच्या सहकारी आमदारांनी कुलगुरूंकडे भूमिका मांडली. या संपूर्ण प्रकरणामुळे मुंबई विद्यापीठातील प्रशासन आणि ठाकरे गटातील संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.




