पुण्यातील प्रसिद्ध ‘वैशाली’ आणि ‘रूपाली’ हॉटेलचे परवाने निलंबित; अस्वच्छता आणि गंभीर त्रुटींमुळे एफडीएची मोठी कारवाई

पुणे | पुणेकरांच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या फर्ग्युसन रस्त्यावरील (एफसी रोड) प्रसिद्ध हॉटेल वैशाली आणि रूपाली रेस्टॉरंटचे अन्न व्यवसाय परवाने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तातडीने निलंबित केले आहेत. स्वयंपाकघरातील अस्वच्छता, अन्नपदार्थांची असुरक्षित साठवणूक, कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र ठेवणे, तसेच स्वच्छतागृहांच्या लगत अन्नपदार्थ तयार करण्याची व्यवस्था अशा गंभीर त्रुटी तपासणीत उघड झाल्या आहेत. त्यामुळे दोन्ही आस्थापनांना सुधारणा होऊन एफडीएकडून लेखी परवानगी मिळेपर्यंत अन्नपदार्थांची विक्री, पार्सल आणि घरपोच सेवा करता येणार नाही.अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत १३ नोव्हेंबर रोजी दोन्ही हॉटेलांची तपासणी करण्यात आली. अन्न सुरक्षा मानकांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
वैशाली हॉटेलच्या तपासणीत ९८ पैकी केवळ ५८ गुण मिळाले. त्यामुळे आस्थापनेची नोंद नियमांचे पालन न करणारी (नॉन-कम्प्लायन्स) अशी करण्यात आली. स्वयंपाकघरात जागेची कमतरता असल्याने कच्चा माल ठेवण्याचा फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या लगत, तर डोसा आणि उत्तप्पा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाच्या शेजारी ठेवण्यात आला होता. धुतलेली भांडीही स्वच्छतागृहासमोरील टेबलावर ठेवण्यात आली होती. उकडलेले बटाटे, शिजवलेला भात आणि अन्य तयार अन्नपदार्थ उघड्या कॉरिडॉरमध्ये ठेवले होते.

हेही वाचा
जळगाव जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; रावेरसह अनेक तालुके हादरले, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
इडली-डोशाचे पीठ तयार करण्याची प्रक्रियाही असुरक्षित जागेत सुरू होती. कच्च्या भाज्या तयार अन्नपदार्थाच्या वर ठेवल्याने अन्न दूषित होण्याचा धोका होता.याशिवाय कीटकप्रतिबंधक दरवाजे, अन्नपदार्थांच्या तापमानाच्या नोंदी, पिण्याच्या पाण्याचा अद्ययावत तपासणी अहवाल आणि ‘फॉस्टॅक’ प्रशिक्षित पर्यवेक्षकाची उपस्थिती नसल्याचे आढळले. विशेष म्हणजे, जून २०२६ मध्येही तपासणी करून सुधारणा करण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र, त्रुटी कायम राहिल्याने परवाना निलंबित करण्यात आला.
रूपालीमध्येही अन्नसाठवणुकीत त्रुटी
रूपाली रेस्टॉरंटच्या तपासणीत स्वयंपाकघर उघडे आणि असुरक्षित असल्याचे दिसून आले. त्यामुळे धूळ, घाण आणि कीटकांचा प्रवेश होण्याची शक्यता होती. परिसरात पाणी साचणे, अपुरी स्वच्छता आणि कचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापन आढळले. कच्चा माल, अर्धप्रक्रियायुक्त आणि तयार अन्नपदार्थ योग्य प्रकारे झाकून ठेवलेले नव्हते. त्यावर लेबल आणि वापरण्याची अंतिम तारीखही नमूद केली नव्हती. कच्चे आणि तयार अन्न वेगळे ठेवण्याची व्यवस्था, तापमान नियंत्रणाच्या नोंदी, अन्न सुरक्षा व्यवस्थापन आराखडा (एफएसएमएस), प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) आणि प्रशिक्षणाच्या नोंदींचाही अभाव होता.
सुधारणा होईपर्यंत व्यवसाय बंद!
सहआयुक्त श्रीकांत आर. करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी तथा सहायक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांच्या आदेशानुसार दोन्ही आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. संबंधित हॉटेलांनी सर्व त्रुटी दूर केल्यानंतर एफडीएकडून पुनर्तपासणी केली जाईल. अन्न सुरक्षा मानकांची पूर्तता झाल्याची खात्री करून विभागाची लेखी परवानगी मिळाल्याशिवाय अन्नपदार्थांची विक्री, पार्सल किंवा होम डिलिव्हरी सुरू करता येणार नाही.




