माता अमृतानंदमयी देवी (अम्मा) यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
शनिवारी निगडी येथील मठात होणार पुरस्कार सोहळा

पिंपरी | निःस्वार्थ प्रेम, माया, करुणा आणि मानवतेच्या सेवेचा वसा जपणाऱ्या विश्वमाता अमृतानंदमयी देवी (अम्मा) यांना मराठी पत्रकार संघातर्फे जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शनिवारी, (दि.१४ नोव्हेंबर) सकाळी १० वाजता, निगडी यमुनानगर मधील माता अमृतानंदमयी मठ येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते अम्मा यांना हा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
अध्यक्षस्थानी पुढारी माध्यम समूहाचे अध्यक्ष डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव असणार आहेत. यावेळी दैनिक सकाळच्या संपादक शीतल पवार, एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक, पुढारी पुणे चे संपादक सुनील माळी, जय महाराष्ट्र चॅनलच्या संपादक वृषाली कदम, दै. सुराज्य चे संपादक राकेश टोळ्ये यांच्यासह विविध संपादक, ज्येष्ठ पत्रकार, लोकप्रतिनिधी आणि उद्योजक प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत. आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, सुनील शेळके, व्ही. जे. डेव्हलपर्स चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जावडेकर, कोहिनूर समूहाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि बीव्हीजी इंडिया लि. चे संस्थापक अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा
माता अमृतानंदमयी देवी यांनी प्रेम, करुणा, मानवसेवा आणि आध्यात्मिक कार्याच्या माध्यमातून देश विदेशात मानवतेचा संदेश पोहोचविला आहे. समाजातील गरजू आणि वंचित घटकांसाठी त्यांनी विविध सेवाभावी उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या या अतुलनीय कार्याचा गौरव करण्यासाठी तसेच मातृत्व, माणुसकी आणि निःस्वार्थ सेवे प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याचे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी यांनी सांगितले.
या जीवनगौरव पुरस्कार सोहळ्यास पत्रकार, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक क्षेत्रातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी यांनी केले आहे.




