गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक आज; महायुतीचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरणार निर्णायक!
राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेत सव्वा-सव्वा वर्षांच्या अध्यक्षपदाचा फॉर्म्युला चर्चेत; रणजीतसिंह पाटील, राजेश पाटील, अजित नरके यांच्यासह अनेकांची नावे चर्चेत

कोल्हापूर : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे. एकूण २५ संचालकांच्या जागांपैकी १३ जागांवर सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीचे, तर १२ जागांवर महायुतीचे संचालक निवडून आले आहेत. त्यामुळे अध्यक्षपद समविचारी आघाडीकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, राज्य सरकारने चार सरकारी संचालकांची नियुक्ती करून त्यांना मतदानाचा अधिकार दिल्याने निवडणुकीचे समीकरण बदलले आहे.
आज सकाळी ११ वाजता शिरगाव येथील गोकुळच्या प्रधान कार्यालयात अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान, महायुतीमध्ये अध्यक्षपदाच्या वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सव्वा-सव्वा वर्षांच्या कालावधीसाठी अध्यक्षपदाचे वाटप करण्याची चर्चा आहे. या फॉर्म्युल्यानुसार पाच वर्षांच्या कार्यकाळात तीन ते चार अध्यक्ष होण्याची शक्यता आहे.
चर्चेनुसार, सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसला, त्यानंतर भाजपला आणि शेवटी शिवसेनेला अध्यक्षपदाची संधी मिळू शकते. उर्वरित कालावधी जनसुराज्य पक्षाला देण्याचीही चर्चा आहे. मात्र, महायुतीतील पहिल्या अध्यक्षपदासाठी नेत्यांमध्ये उत्साह नसल्याचे चित्र आहे. सध्याचे राजकीय वातावरण आणि विरोधकांकडून होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर तिन्ही पक्षांतील काही नेते अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्याबाबत सावध भूमिका घेत असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून रणजीतसिंह पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. ते माजी आमदार के. पी. पाटील यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्यासोबतच माजी आमदार राजेश पाटील यांचे नावही चर्चेत आहे. शिंदे यांच्या शिवसेनेकडून अजित नरके यांच्या नावाची चर्चा होती. तर भाजपकडून अंबरीष घाटगे आणि डॉ. चेतन नरके यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.
दुसरीकडे, सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीकडून शशिकांत चुयेकर यांचे नाव अध्यक्षपदासाठी यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आजच्या निवडणुकीत महायुती आणि समविचारी आघाडी यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीत निवडून आलेले २५ संचालक आणि शासननियुक्त चार संचालक असे एकूण २९ जण मतदान करणार आहेत. शासननियुक्त चार संचालकांसाठी स्वतंत्र मतपेटीची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेचे छायाचित्रण केले जाणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरगाव येथील गोकुळच्या प्रधान कार्यालय परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले असून, महायुती आणि समविचारी आघाडीच्या समर्थकांसाठी पोलिसांनी स्वतंत्र जागा निश्चित केल्या आहेत. दोन्ही बाजूंचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. आता गोकुळच्या अध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




