गिरीश महाजन यांनी आदिवासी बांधवांसोबत साजरी केली दिवाळी; बोरमळी येथे फराळ वाटपातून जपली सामाजिक बांधिलकी
यावल तालुक्यातील आदिवासी पाड्यावर सहकुटुंब भेट; ग्रामस्थांशी संवाद साधत स्नेहभोजनाचा घेतला आनंद

जळगाव : दीपावली हा आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण आहे. हा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या भावनेतून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी यावल तालुक्यातील बोरमळी येथे आदिवासी बांधवांसोबत सहकुटुंब दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी आदिवासी पाड्यावरील बंधू-भगिनींना दिवाळी फराळाचे वाटप केले. तसेच सर्वांसोबत स्नेहभोजनाचा आनंद घेतला.
दिवाळीनिमित्त आदिवासी बांधवांच्या भेटीला गेलेल्या मंत्री महाजन यांनी ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला. फराळ वाटपाच्या माध्यमातून त्यांनी केवळ सणाचा आनंदच नव्हे, तर आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीची भावनाही जपली. यावेळी उपस्थितांच्या चेहऱ्यावरील आनंद, उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रेमळ संवादामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
हेही वाचा – दादा भुसे यांची गाळणे गावाला दिवाळी भेट; प्रवचन, स्नेहभोजनातून ग्रामस्थांशी जपला आपुलकीचा संवाद
समाजातील प्रत्येक घटकाला सण-उत्सवांचा आनंद घेता यावा आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान व समृद्धी नांदावी, हीच या दीपोत्सवामागील भावना असल्याचे या उपक्रमातून दिसून आले. माणुसकीचे नाते जपत समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन सण साजरा करण्याचा हा उपक्रम उपस्थितांसाठी विशेष आनंददायी ठरला. आदिवासी बांधवांसोबतच्या या स्नेहपूर्ण सहवासामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून आले.
यावेळी आमदार अमोल जावळे, जामनेरच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्यासह विविध पदाधिकारी, आदिवासी बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




