पृथ्वी शॉच्या वाढदिवशी आकृती अग्रवालची खास पोस्ट
साखरपुडा मोडल्यानंतर पुन्हा एकत्र आलेल्या पृथ्वी-आकृतीच्या नात्याची चर्चा; क्रिकेटमधील यशासाठीही आकृतीने दिल्या शुभेच्छा

Prithvi Shaw Birthday : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आकृती अग्रवाल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पृथ्वी शॉच्या वाढदिवसानिमित्त आकृतीने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमधून तिने पृथ्वीवरील प्रेम व्यक्त करण्यासोबतच त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील यशासाठीही शुभेच्छा दिल्या. काही महिन्यांपूर्वी दोघांचा साखरपुडा मोडल्याची बातमी समोर आली होती. मात्र, त्यानंतर गैरसमज दूर झाल्याचे सांगत आकृतीने पुन्हा एकत्र आल्याचे स्पष्ट केले होते.
पृथ्वीच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या पोस्टमध्ये आकृतीने त्याला आयुष्यात भरभरून आनंद, यश आणि उत्तम आरोग्य मिळावे, अशी इच्छा व्यक्त केली. क्रिकेटवरील त्याचे प्रेम, खेळाप्रती असलेली निष्ठा आणि मेहनतीचेही तिने कौतुक केले. स्वतःवर आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचा सल्ला देत तिने पृथ्वीला प्रोत्साहन दिले.
‘तुला अजून अनेक सामने खेळायचे आहेत, अनेक विक्रम करायचे आहेत आणि अनेक विजय मिळवायचे आहेत,’ अशा शब्दांत आकृतीने त्याचा उत्साह वाढवला. दिवाळीच्या शुभेच्छा देतानाही तिने हा सण पृथ्वीच्या आयुष्यात नवीन सुरुवात, सकारात्मकता, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो, अशी भावना व्यक्त केली.
‘मी नेहमीच तुझ्यासाठी आनंदाने टाळ्या वाजवत राहीन. तुझ्या प्रत्येक यशाचा आनंद साजरा करेन आणि तुझ्या क्षमतेवर विश्वास ठेवेन,’ असेही तिने पोस्टमध्ये म्हटले. अखेरीस ‘माझ्या आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या आणि दिवाळीच्या शुभेच्छा, आय लव्ह यू,’ असे लिहित तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.
मार्चमध्ये साखरपुडा, सप्टेंबरमध्ये नाते तुटल्याची घोषणा
पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांनी ८ मार्च २०२६ रोजी मोठ्या थाटामाटात साखरपुडा केला होता. त्यानंतर दोघांच्या नात्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. मात्र, १७ सप्टेंबर २०२६ रोजी आकृतीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत साखरपुडा मोडल्याचे जाहीर केले. या घोषणेमुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
गैरसमजुतीमुळे घेतला होता साखरपुडा मोडण्याचा निर्णय
सप्टेंबरमधील घोषणेनंतर ऑक्टोबरमध्ये आकृतीने आणखी एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये साखरपुडा मोडण्याचा निर्णय घाईत घेतल्याचे तिने स्पष्ट केले. बाहेरील लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवल्यामुळे आणि गैरसमजुतीतून हा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले. तसेच, स्वतःच्या चुकीची जबाबदारीही स्वीकारली.
यानंतर पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल पुन्हा एकत्र आल्याचे तिने जाहीर केले होते. आता पृथ्वीच्या वाढदिवसानिमित्त आकृतीने केलेल्या प्रेमळ पोस्टमुळे या दोघांच्या नात्याची पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.




