TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

लालकृष्ण अडवाणी १०० व्या वर्षात पदार्पण करणार; भाजप मुख्यालयात विशेष पूजा आणि हवनाचे आयोजन

८ नोव्हेंबरला ९९ वा वाढदिवस; अडवाणी यांच्या उत्तम आरोग्यासाठी भाजप नेते आणि कार्यकर्ते करणार प्रार्थना

Lal Krishna Advani Birthday : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी रविवारी (८ नोव्हेंबर) वयाच्या ९९ वर्षांत पदार्पण करत आहेत. त्यांच्या ९९ व्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात विशेष हवन, पूजा आणि प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक विधींच्या माध्यमातून पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते अडवाणी यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणार आहेत.

८ नोव्हेंबर १९२७ रोजी जन्मलेले अडवाणी रविवारी आयुष्याच्या १०० व्या वर्षात प्रवेश करणार आहेत. या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि अडवाणी यांच्या कन्या प्रतिभा अडवाणी उपस्थित राहणार आहेत. भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात सकाळी १० वाजता पूजा आणि हवनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.

हवन आणि पूजेनंतर अडवाणी यांच्या जीवनप्रवासावर आणि राजकीय कारकीर्दीवर आधारित विशेष सादरीकरण दाखवण्यात येणार आहे. त्यांच्या सार्वजनिक जीवनातील महत्त्वाचे टप्पे आणि योगदानाचा या सादरीकरणातून आढावा घेतला जाणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात येईल.

प्रकृतीत चढ-उतार; ऑक्टोबरमध्ये रुग्णालयातून डिस्चार्ज

गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या वयामुळे अडवाणी यांच्या प्रकृतीत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. छातीत संसर्ग झाल्यामुळे त्यांना १६ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने १९ ऑक्टोबर रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यापूर्वी मे महिन्यातही वयोमानानुसार उद्भवलेल्या आरोग्यविषयक तक्रारींमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

२०२४ मध्येही अडवाणी यांना अपोलो आणि एम्स रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते. डिसेंबर २०२४ मध्ये त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर २५ डिसेंबर रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

हेही वाचा –  न्यूझीलंड निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अटीतटीची लढत; छोट्या पक्षांची भूमिका ठरणार महत्त्वाची

पंतप्रधान मोदींनी घेतले होते आशीर्वाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती आणि आशीर्वाद घेतले होते. सार्वजनिक सेवेत पंतप्रधान म्हणून २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी ही भेट घेतली होती. या भेटीनंतर अडवाणी यांच्या योगदानाचा गौरव करताना, त्यांच्या अनेक दशकांच्या जनसेवेचा देशाच्या वाटचालीवर आणि राष्ट्रजीवनावर कायमस्वरूपी ठसा उमटल्याचे मोदी यांनी म्हटले होते.

भाजपच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका

लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म अखंड भारतातील कराची येथे झाला. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात स्थायिक झाले. भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाचा विस्तार आणि संघटनात्मक बांधणी करण्यात अडवाणी यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.

अडवाणी यांनी तीन वेळा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय गृहमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. २००२ ते २००४ या काळात त्यांनी देशाचे उपपंतप्रधानपदही भूषवले.

राजकीय आणि सार्वजनिक जीवनातील योगदानाबद्दल मार्च २०२४ मध्ये त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारत रत्न’ प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना हा सन्मान प्रदान केला होता.

अडवाणी यांच्या ९९ व्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमातून त्यांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासाचा आणि पक्षासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव केला जाणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group