सिल्व्हर ओकवर राजकीय घडामोडींना वेग; शरद पवारांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दाखल
पार्थ पवार यांच्यानंतर शशिकांत शिंदे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांच्याशी चर्चा; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण

Silver Oak Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक येथील निवासस्थानी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दोन दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते आपल्या निवासस्थानी परतले आहेत. दरम्यान, त्यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील अनेक ज्येष्ठ नेते सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शशिकांत शिंदे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या नेत्यांसोबत शरद पवार यांची गेल्या दोन तासांपासून चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या बैठकीत नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
विशेष म्हणजे, या नेत्यांच्या भेटीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते पार्थ पवार यांनीही शरद पवार यांची भेट घेतली होती. पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यात सुमारे दोन तास चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यानंतर आता शरद पवार गटातील प्रमुख नेत्यांची बैठक सुरू असल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा – गोकुळ निवडणुकीत नवा ट्विस्ट! सतेज पाटील यांच्या वकिलांवर खोट्या नोटिसांचा आरोप; धनंजय महाडिकांचा दावा
दरम्यान, शरद पवार रुग्णालयात उपचार घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनीही त्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला होता.
याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महत्त्वाचा दावा केला होता. सध्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, अजित पवार हयात असते तर १२ फेब्रुवारी रोजीच दोन्ही गटांचे विलिनीकरण झाले असते, अशी कल्पना अजित पवार यांनी आपल्याला दिली होती, असे तटकरे यांनी म्हटले होते.
तटकरे यांच्या या वक्तव्यानंतर विलिनीकरणाच्या चर्चांना आणखी हवा मिळाली. आता शरद पवार यांच्या निवासस्थानी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची सुरू असलेली बैठक लक्षवेधी ठरत आहे. या बैठकीत विलिनीकरणासह पक्षाच्या भविष्यातील राजकीय रणनीतीवर चर्चा झाली आहे का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, बैठकीचा अधिकृत तपशील समोर आल्यानंतरच याबाबत स्पष्टता येणार आहे.




