दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा! शेतपाणंद रस्त्यांसाठी ११६ कोटींचा निधी मंजूर
मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेंतर्गत निधी वितरित; रखडलेल्या कामांना मिळणार गती, ग्रामीण भागात स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा.

मुंबई : यंदा पावसाने दडी मारल्याने राज्यातील शेतकरी खरीप हंगामासह रब्बी हंगामाच्या संकटाला सामोरे जात आहेत. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैमध्ये चांगला पाऊस झाला; मात्र त्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. पिकांचे अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यातच जनावरांच्या चाऱ्याची टंचाईही जाणवू लागली आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेंतर्गत ११६ कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत हा निधी देण्यात आला असून, त्यामुळे रखडलेल्या शेत-पाणंद रस्त्यांच्या कामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.
रखडलेल्या रस्त्यांच्या कामांना मिळणार चालना
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत बारमाही रस्ते उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना राबवली जात आहे. कुशल अनुदानाअभावी रखडलेल्या कामांना आता ११६ कोटी रुपयांच्या निधीमुळे चालना मिळणार आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण करण्यावर शासनाचा भर असल्याची माहिती मंत्री भरत गोगावले यांनी दिली.
हेही वाचा – राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची कोणतीही चर्चा नाही; अनिल पाटील यांचे स्पष्ट विधान
दुष्काळी परिस्थितीत स्थानिक रोजगाराच्या संधी
या रस्त्यांच्या कामांमुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतमजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. दुष्काळाच्या काळात रोजगारासाठी गाव सोडून इतर ठिकाणी स्थलांतर करण्याची वेळ अनेक कुटुंबांवर येते. अशा परिस्थितीत गावातच काम उपलब्ध झाल्यास स्थलांतराचे प्रमाण कमी होण्यास हातभार लागू शकतो.
शेतकऱ्यांना आगाऊ मदतीनंतर आणखी दिलासा
दरम्यान, दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने यापूर्वी पाच हजार रुपयांची आगाऊ मदत जाहीर केली होती. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाल्याचे सांगण्यात आले होते. आता शेत-पाणंद रस्त्यांसाठी निधी वितरित केल्याने ग्रामीण भागातील विकासकामांना आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.




