ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘पहिला दिवा माझ्या राजासाठी’… १००१ दिव्यांनी उजळला ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’चा परिसर!

हेल्प फाउंडेशनच्या दीपोत्सवातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना

शिवशंभूंचे विचार भावी पिढ्यांमध्ये रुजवण्याच्या संकल्पाला सुरुवात

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा अर्थात ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ उभारण्यामागे केवळ भव्य स्मारक निर्माण करण्याची संकल्पना नव्हती, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार, शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्यनिष्ठा भावी पिढ्यांच्या मनामनांत रुजवण्याचा व्यापक उद्देश होता. आज ‘पहिला दिवा माझ्या राजासाठी’ या दीपोत्सवाच्या माध्यमातून त्या संकल्पनेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाल्याचे मनस्वी समाधान वाटते, अशा भावना आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या.

दिवाळीच्या मंगलमय पर्वाच्या पार्श्वभूमीवर हेल्प फाउंडेशनच्या वतीने मोशी-बोऱ्हाडेवाडी येथील ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ परिसरात ‘दीप उत्सव सोहळा २०२६’ अंतर्गत ‘पहिला दिवा माझ्या राजासाठी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी १००१ दिवे प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले. दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेल्या स्मारक परिसरात शिवशंभूंच्या पराक्रमाचा, त्यागाचा आणि स्वराज्यनिष्ठेचा जागर करण्यात आला. या उपक्रमातून ऐतिहासिक वारशाचे जतन आणि नव्या पिढीमध्ये स्वराज्याच्या विचारांची प्रेरणा निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.

हेही वाचा

पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्त

आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून सुमारे १४० फूट उंचीच्या या पुतळ्याची निर्मिती जागतिक कीर्तीचे शिल्पकार स्वर्गीय राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम, धर्मनिष्ठा आणि स्वराज्यासाठीचे बलिदान पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे. जगातील सर्वात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा म्हणून या स्मारकाचा गौरव करण्यात येतो.

या स्मारक परिसरात ऐतिहासिक ‘शंभूसृष्टी’ विकसित करण्याची संकल्पना आहे. त्यामध्ये सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यासह स्वराज्याच्या इतिहासातील सरदार-मावळ्यांचे पुतळे, ऐतिहासिक प्रसंग दर्शविणारी शिल्पे, म्युरल्स, ओपन एअर थिएटर आणि आधुनिक दृकश्राव्य सुविधांचा समावेश प्रस्तावित आहे. त्यामुळे हे स्मारक केवळ पर्यटनस्थळ न राहता शिवकालीन इतिहास, संस्कृती आणि स्वराज्याच्या विचारांचे प्रेरणाकेंद्र व्हावे, असा उद्देश आहे.

हिंदूभूषण स्मारक ट्रस्टच्या माध्यमातून या स्मारकाच्या अनुषंगाने विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक उपक्रमांना चालना दिली जात आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाचा प्रसार, शिवशंभूंच्या विचारांची जनजागृती आणि तरुण पिढीला स्वराज्याच्या प्रेरणादायी इतिहासाशी जोडण्याच्या दृष्टीने उपक्रम राबवले जात आहेत. सामूहिक मानवंदना, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ऐतिहासिक वारशाचा जागर यांमधून स्मारकाच्या मूळ संकल्पनेला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न होत आहे.

“धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याचा संकल्प केला, तेव्हा डोळ्यांसमोर केवळ एक भव्य वास्तू नव्हती. शिवशंभूंचा जाज्वल्य इतिहास, त्यांचे शौर्य, त्याग आणि स्वराज्यनिष्ठेचे विचार भावी पिढ्यांच्या मनामनांत रुजवण्याचे स्वप्न होते. आज हेल्प फाउंडेशनच्या वतीने ‘पहिला दिवा माझ्या राजासाठी’ या उपक्रमातून १००१ दिव्यांची मानवंदना देण्यात आली. या निमित्ताने त्या संकल्पनेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाल्याचे समाधान वाटते. पुतळ्याची उंची जग पाहील; मात्र शिवशंभूंच्या विचारांची उंची भावी पिढ्यांच्या कर्तृत्वातून दिसली पाहिजे. दुसरा दिवा माझ्या दुष्काळग्रस्त परिस्थितीत लढणाऱ्या शेतकऱ्यासाठी आणि बळीराजासाठी प्रज्वलित करण्याचा आमचा संकल्प आहे.”

– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी- चिंचवड, पुणे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group