Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी समन्वयाने काम करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा

पुणे | जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन, चारा उत्पादन, जलसंधारणाची कामे आणि टंचाई निवारणाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून नागरिकांना वेळेत मदत उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी पुणे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, महापौर मंजुषा नागापुरे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार विजय शिवतारे, आमदार राहुल कुल, आमदार शंकर मांडेकर, आमदार बाबाजी काळे, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. राजेश देशमुख,जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

पिण्यासाठी राखीव ठेवलेल्या पाण्याचा वापर नियोजनानुसार करावा. ग्रामीण भागात आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा. रब्बी हंगामातील पिकांसाठी पाण्याचे नियोजन करताना पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.

चारा उत्पादन आणि जलसंधारणावर भर

दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्ध व्हावा, यासाठी चारा लागवड प्रकल्प राबविण्यात येत असून, शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून कमी पाण्यात येणाऱ्या चारा पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन द्यावे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

मीनाक्षी शिंदेंचा शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा; प्रताप सरनाईकांच्या सल्ल्यानंतर २४ तासांत निर्णय

जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेऊन पाण्याचे स्रोत बळकट करावेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करावी. नगरपरिषद क्षेत्रांसह ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे प्रभावी नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

दुष्काळी परिस्थितीमुळे इतर भागातून नागरिकांचे स्थलांतर होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने सतर्क राहावे. शासकीय योजनांची अंमलबजावणी विलंब न करता करून नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी. यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या टंचाई निवारणाच्या उपाययोजनांची माहिती दिली.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात १ हजार ५४ जलसंधारणाची कामे निश्चित करण्यात आली आहेत. शासनाच्या निर्देशानुसार कामाबाबत आराखडा तयार करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली. शेततळी, बंधाऱ्यांची दुरुस्ती, जलस्रोतांचे बळकटीकरण आणि कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना फळ्या बसविण्याबाबत कामे प्रस्तावित आहेत. बैठकीला जिल्ह्यातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button