इंडिगोच्या विमानात बॅगेने घेतला पेट; हैदराबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, सर्व प्रवासी सुखरूप
दिल्ली-चेन्नई प्रवासादरम्यान घडली घटना; क्रू मेंबर्सनी वेळीच आग नियंत्रणात आणली, पॉवर बँकमुळे आग लागल्याचा दावा मात्र अधिकृत पुष्टी नाही

नवी दिल्ली : दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात प्रवासादरम्यान एका प्रवाशाच्या सामानाला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे विमानातील प्रवाशांमध्ये घबराट पसरली. मात्र, केबिन क्रूने तातडीने परिस्थिती हाताळत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. खबरदारीचा उपाय म्हणून विमानाचे हैदराबाद येथील राजीव गांधी इंटरनॅशनल विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या घटनेत सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोच्या 6E 6115 या विमानात ही घटना घडली. विमान प्रवासात असताना एका प्रवाशाच्या बॅगेत आग लागल्याचे निदर्शनास आले. यानंतर विमानातील क्रू मेंबर्सनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आवश्यक उपाययोजना केल्या. वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने संभाव्य मोठा अनर्थ टळला.
पॉवर बँकमुळे आग लागल्याचा दावा
विमान हैदराबाद विमानतळावर उतरवण्यात आल्यानंतर इंडिगोच्या प्रवक्त्याने या घटनेबाबत माहिती दिली. एका प्रवाशाच्या सामानाला अचानक आग लागली होती. मात्र, क्रू मेंबर्सनी वेळेत परिस्थिती नियंत्रणात आणली. बॅगेतील नेमक्या कोणत्या वस्तूमुळे आग लागली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याचे प्रवक्त्याने स्पष्ट केले.
दरम्यान, विमानातील काही प्रवाशांनी संबंधित बॅगेत पॉवर बँक असल्याचा आणि त्यामुळेच आग लागल्याचा दावा केला आहे. मात्र, या दाव्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा – विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपची पक्षशिस्तीवर ठाम भूमिका; अमरावतीतील तीन बंडखोरांवर कारवाई
प्रवाशांना दुसऱ्या विमानाने चेन्नईला रवाना
घटनेनंतर विमानाचे हैदराबाद येथील राजीव गांधी इंटरनॅशनल विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. त्यानंतर प्रवाशांना पुढील प्रवासासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली. या विमानातून सर्व प्रवाशांना चेन्नईला रवाना करण्यात आल्याची माहिती आहे.
विमानातील आगीच्या घटनेमुळे काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, क्रू मेंबर्सनी तातडीने केलेल्या उपाययोजनांमुळे परिस्थिती नियंत्रणात आली. आगीचे कारण आणि बॅगेतील वस्तूंबाबत अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.




