MPSC आंदोलनात ड्रोन उडविल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा; आंदोलनाशी संबंधित दुसरी कारवाई
एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनस्थळी विनापरवानगी ड्रोन उडविल्याचा आरोप; ड्रोन जप्त, आमदार रोहित पवार म्हणाले, ‘अध्यक्षांचा राजीनामा घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही’

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेल्या परीक्षार्थींच्या आंदोलनाशी संबंधित आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी पेठेतील एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनस्थळी विनापरवानगी ड्रोन उडविल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी विद्यार्थी प्रतिनिधींसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आंदोलनाशी संबंधित हा दुसरा गुन्हा असून, पोलिसांनी ड्रोन जप्त केला आहे.
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी १ ऑक्टोबरपासून एस. एम. जोशी पूल परिसरात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाची परवानगी रद्द केल्याची माहिती दिल्यानंतरही लालबहाद्दूर शास्त्री रस्त्यावर बेकायदा आंदोलन केल्याच्या आरोपावरून शुक्रवारी (९ ऑक्टोबर) विद्यार्थी प्रतिनिधींसह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर शनिवारी (१० ऑक्टोबर) विनापरवानगी ड्रोन उडविल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा – SIR वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; ‘फॉर्म ७’ भरण्यावर १० अर्जांची मर्यादा
ड्रोन उडविण्यासाठी परवानगी नसल्याचा आरोप
या प्रकरणी पोलीस हवालदार युवराज टोळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिगंबर भारत खारे, प्रमोद पाटील, शिवराज मोरे, ऋषिकेश गागुर्डे आणि अक्षय कांबळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हवालदार टोळे एस. एम. जोशी पूल परिसरात बंदोबस्तासाठी तैनात होते. त्या वेळी आंदोलनस्थळी ड्रोन उडताना दिसला. पाहणी केली असता, आंदोलनाच्या मागील बाजूस दिगंबर खारे रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने ड्रोन चालवत असल्याचे आढळले.
ड्रोन उडवून चित्रीकरण करण्यासाठी आवश्यक परवानगी आणि स्थानिक पोलिसांची परवानगी आहे का, अशी विचारणा पोलिसांनी केली. मात्र, अशी कोणतीही परवानगी नसल्याचे खारे यांनी सांगितल्याचा उल्लेख फिर्यादीत आहे. आंदोलनात सहभागी प्रमोद पाटील आणि इतरांच्या सांगण्यावरून ड्रोन आणल्याचेही त्यांनी सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस करीत आहेत.
‘अध्यक्षांचा राजीनामा घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही’
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेतला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आपण MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झालो असताना, आपल्याऐवजी विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
सरकारचे ऐकून पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करणे आणि नोटिसा बजावणे असे प्रकार सुरू असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. आंदोलन मोडीत काढण्यासाठी हा त्रास दिला जात असल्याचेही ते म्हणाले.
“कोणत्याही परिस्थितीत MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही,” अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडली. यासंदर्भात विश्रामबाग पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचे आणि आंदोलनाला परवानगी मिळण्यासाठी अर्ज सादर केल्याचेही त्यांनी सांगितले.
MPSC परीक्षार्थींच्या मागण्या, आंदोलनाची परवानगी आणि पोलिसांची कारवाई यांवरून पुण्यातील वातावरण तापले असून, या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे लक्ष लागले आहे.




