TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तिसरी-चौथी मुंबईच्या नियोजनाला वेग; ५६५ गावांतील २,००८ चौ. किमी क्षेत्राचा जमीन वापर अहवाल पूर्ण

अडीच महिन्यांत MMRDAचा अहवाल तयार; पनवेल-उरण-पेणमध्ये ३२४ चौ. किमी, पालघरमध्ये १,००७ चौ. किमी क्षेत्राचा विकास प्रस्तावित

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाच्या (MMR) विस्ताराला आता नियोजनबद्ध दिशा मिळणार आहे. तिसरी मुंबई, चौथी मुंबई आणि दक्षिण विस्तारित अधिसूचित क्षेत्र (अलिबाग) यांच्या विकासासाठीचा विद्यमान जमीन वापराचा अहवाल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) पूर्ण केला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अवघ्या अडीच महिन्यांत हा अहवाल तयार करण्यात आला असून, महामुंबईतील ५६५ गावांमधील सुमारे २,००८ चौ. किमी क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

MMRDAचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’च्या उद्घाटनावेळी हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. या अहवालाच्या आधारे तिन्ही नियोजन क्षेत्रांसाठी प्रस्तावित जमीन वापराचा आराखडा तयार करण्याची पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे.

तिसरी मुंबईसाठी ३२४ चौ. किमी क्षेत्र

अटल सेतूमुळे नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरातील विकासाच्या संधी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पेण, उरण आणि पनवेल तालुक्यांतील १२४ गावांमधील सुमारे ३२४ चौ. किमी क्षेत्राचा विकास ‘तिसरी मुंबई’ म्हणून करण्याचे नियोजन आहे.

हेही वाचा –  ‘अध्यक्षांचा राजीनामा विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवू शकत नाही’; MPSC आंदोलनावर मुरलीधर मोहोळ यांचा सल्ला

पालघरमध्ये चौथी मुंबई

वाढवण येथे देशातील मोठ्या बंदर प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर पालघर परिसरात विकासाच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. या अनुषंगाने पालघरमधील २२४ गावांतील सुमारे १,००७ चौ. किमी क्षेत्राचा ‘चौथी मुंबई’ म्हणून विकास करण्याचे नियोजन आहे. या क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) पुढील नियोजन केले जाणार आहे.

अलिबाग-रायगडचा पर्यटनदृष्ट्या विकास

रायगड आणि अलिबाग परिसरातील २१७ गावांमधील सुमारे ६७७ चौ. किमी क्षेत्राचा दक्षिण विस्तारित अधिसूचित क्षेत्र म्हणून विकास केला जाणार आहे. या भागाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचे नियोजन आहे.

४५ टक्के क्षेत्र हरित आणि वन क्षेत्र

तिन्ही नियोजन क्षेत्रांपैकी सुमारे ४५ टक्के भाग वन आणि हरित क्षेत्रांच्या श्रेणीत येतो. त्यामुळे संबंधित प्राधिकरणांच्या समन्वयाने या क्षेत्रांचे संरक्षण आणि पर्यावरणीय पुनर्स्थापनेला प्राधान्य दिले जाणार आहे. खारफुटी, पाणथळ क्षेत्रे, नद्या, जलस्रोत आणि नैसर्गिक जलनिस्सारण प्रणालीचेही संरक्षण करण्याचे नियोजन आहे.

उर्वरित सुमारे ५५ टक्के क्षेत्र विकासासाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या भागात MMRDAसह विविध प्राधिकरणांना नियोजनबद्ध पद्धतीने पायाभूत सुविधा आणि इतर विकासकामे करता येणार आहेत.

प्रस्तावित जमीन वापर आराखड्याला सुरुवात

विद्यमान जमीन वापराचा अहवाल पूर्ण झाल्यानंतर आता तिन्ही क्षेत्रांसाठी प्रस्तावित जमीन वापराचा आराखडा तयार केला जाणार आहे. त्यानंतर आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून तिसरी मुंबई, चौथी मुंबई आणि दक्षिण विस्तारित अधिसूचित क्षेत्राच्या विकासाला पुढे नेले जाणार आहे.

गुंतवणूक आकर्षित करणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि नागरिकांचे जीवनमान उंचावणे, तसेच महामुंबई आणि महाराष्ट्राला एक ट्रिलियन अमेरिकी डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने घेऊन जाणे हे या नियोजनामागील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group