ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुनावळेतील प्रस्तावित कचरा प्रक्रिया केंद्राला नागरिकांचा विरोध

प्रस्ताव रद्द करून पर्यायी जागा निवडण्याची मागणी; आरोग्य, पर्यावरण आणि सार्वजनिक सुरक्षिततेबाबत चिंता

पिंपरी-चिंचवड | पुनावळे येथील प्रस्तावित कचरा प्रक्रिया केंद्र अथवा ट्रान्सफर स्टेशनला नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. दाट निवासी परिसरात अशा प्रकल्पामुळे आरोग्य, पर्यावरण आणि वाहतुकीवर संभाव्य परिणाम होऊ शकतात, अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे. प्रस्ताव रद्द करून निवासी वस्त्यांपासून योग्य अंतरावर पर्यायी जागेचा विचार करावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.

परिसरातील वाढती लोकसंख्या, गृहनिर्माण सोसायट्या, शाळा आणि भविष्यातील विकास लक्षात घेऊन प्रकल्पाच्या जागेची निवड करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पुनावळेकरांचे आरोग्य आणि पुढील पिढ्यांचे हित सर्वोच्च प्राधान्याने जपावे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

दुर्गंधी, प्रदूषणाच्या संभाव्य परिणामांबाबत चिंता

कचरा प्रकल्पामुळे उद्भवू शकणारी दुर्गंधी, प्रदूषण, कीटक व उंदरांचा उपद्रव आणि आवाज यांविषयी नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. प्रस्तावित जागेचा पर्यावरणीय व आरोग्यविषयक सखोल अभ्यास करून संभाव्य परिणाम स्पष्ट करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा

‘दृश्यम ३’ची बॉक्स ऑफिसवर त्सुनामी! अवघ्या २ दिवसांत केली ११५ कोटींची कमाई

कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या संभाव्य धोक्याचाही स्वतंत्र अभ्यास करावा, असा नागरिकांचा आग्रह आहे. निवासी वस्त्या आणि शाळांच्या परिसरातील सार्वजनिक सुरक्षिततेचा विचार निर्णय प्रक्रियेत प्राधान्याने व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

नागरिकांशी चर्चा करूनच निर्णय घ्या

प्रकल्पाबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पुनावळेकर नागरिक, गृहनिर्माण संस्था आणि सामाजिक संघटनांशी सार्वजनिक चर्चा करण्यात यावी, अशी मागणी आहे. संबंधित सर्व अहवाल आणि निर्णय प्रक्रिया नागरिकांसमोर पारदर्शकपणे मांडावी. नागरिकांच्या हरकती व सूचना विचारात घेऊनच पुढील निर्णय घ्यावा, अशी भूमिका मांडण्यात आली आहे.

प्रस्तावित कचरा प्रक्रिया केंद्रावरील विरोधाची तातडीने दखल घेऊन संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश द्यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पर्यायी जागेचा विचार करताना आरोग्य, पर्यावरण, सुरक्षितता आणि परिसराच्या भविष्यातील विकासाला प्राधान्य द्यावे, असा पुनावळेकरांचा आग्रह आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button