आर.के.एल. गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची बॉक्सिंगमध्ये बाजी; योगिताला सुवर्ण, तर तन्मयला रौप्य पदक

पिंपरी-चिंचवड | नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद (ZP) बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत ‘आर.के.एल. गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत मोठे यश संपादन केले आहे. या स्पर्धेत शाळेच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाच्या बळावर सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई करत शाळेचा नावलौकिक वाढवला.
स्पर्धेत इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी योगिता हिने ‘अंडर-१९’ वयोगटात अत्यंत प्रभावी खेळ दाखवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर ‘अंडर-१४’ वयोगटात तन्मय याने जोरदार झुंज देत उपविजेतेपदासह रौप्य पदक पटकावले.
हेही वाचा
विद्यार्थ्यांच्या या दणदणीत यशाबद्दल आर.के.एल. गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलचे सीईओ डॉ. पुष्कर चोबे आणि सीओओ मित्तल शहा यांनी योगिता व तन्मय यांचे विशेष कौतुक केले. “विद्यार्थ्यांचे हे यश संपूर्ण शाळेसाठी आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे,” असे डॉ. पुष्कर चोबे यांनी म्हटले.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका, क्रीडा प्रशिक्षक आणि शिक्षकवृंदांनी दोन्ही विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांना पुढील क्रीडा वाटचालीस व उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.




