ताज्या घडामोडीBreaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडापिंपरी / चिंचवड

अभिमानास्पद: पिंपरी-चिंचवडच्या प्रिथिकाचा आशियाई स्पर्धेत सुवर्णवेध!

भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाजी संघाचा चीनवर २३८–२३४ ने विजय; जागतिक विक्रमाशी बरोबरी

पिंपरी- चिंचवड : अचूक निशाणा, संयम आणि सांघिक कौशल्याच्या जोरावर भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाजी संघाने एची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. चीनचा अंतिम फेरीत २३८–२३४ असा पराभव करणाऱ्या भारतीय संघात पिंपरी-चिंचवडची प्रिथिका प्रदीप हिने महत्त्वपूर्ण योगदान दिले. तिच्या या कामगिरीमुळे शहराच्या क्रीडा इतिहासात सुवर्णपान जोडले गेले आहे.

प्रिथिका प्रदीप, ज्योती सुरेखा वेन्नम आणि चिकिता तनीपार्थी या त्रिकुटाने अंतिम सामन्यात प्रभावी कामगिरी केली. भारतीय संघाने नोंदवलेल्या २३८ गुणांमुळे दक्षिण कोरियाने २०१४ मध्ये प्रस्थापित केलेल्या जागतिक आणि आशियाई विक्रमाशी बरोबरी साधली. या विजयासह भारतीय महिला संघाने सलग दुसऱ्यांदा आशियाई स्पर्धेतील विजेतेपद कायम राखले.

सुवर्णपदकापर्यंतचा प्रवासही चुरशीचा ठरला. उपांत्य फेरीत भारताने दक्षिण कोरियावर २३४–२३३ असा अवघ्या एका गुणाने विजय मिळवला होता. निर्णायक क्षणी दडपणाचा सामना करत भारतीय तिरंदाजांनी अंतिम फेरी गाठली आणि चीनविरुद्धही आपली अचूकता कायम ठेवत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली.

हेही वाचा –  ‘लोकशाही देशातील कोणत्याही व्यक्तीपेक्षा मोठी’; INDIA आघाडीच्या बैठकीनंतर राहुल गांधींचं सरकारला थेट आव्हान

शहरातील धनुर्विद्येला नवी प्रेरणा

प्रिथिकाच्या यशाने पिंपरी-चिंचवडमधील उदयोन्मुख खेळाडूंसमोर आंतरराष्ट्रीय यशाचे प्रेरणादायी उदाहरण उभे राहिले आहे. शहरातून घडलेल्या खेळाडूने भारताचे प्रतिनिधित्व करत आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणे, ही स्थानिक क्रीडा क्षेत्रासाठी मोलाची उपलब्धी ठरली आहे. तिच्या वाटचालीत प्रशिक्षक कुणाल टावरे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि तांत्रिक प्रशिक्षण महत्त्वाचे ठरले. पालकांचा भक्कम पाठिंबा, नियमित सराव आणि खेळाप्रती असलेली निष्ठा यांच्या बळावर प्रिथिकाने हे यश संपादन केले. पिंपरी-चिंचवड आर्चरी असोसिएशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या गुणवंत खेळाडू घडविण्याच्या प्रयत्नांनाही या कामगिरीमुळे प्रोत्साहन मिळाले आहे.

‘शालेय वयातील गुणवत्ता सुवर्णपदकापर्यंत पोहोचली’

महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या सहसचिव तथा पिंपरी-चिंचवड आर्चरी असोसिएशनच्या सचिव सोनल बुंदेले यांनी प्रिथिकाच्या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त केला. “प्रिथिकाची गुणवत्ता आणि तिच्यातील विशेष टॅलेंट शालेय वयात असतानाच ओळखण्याची संधी मला मिळाली होती. तिची जिद्द, मेहनत, शिकण्याची तयारी आणि खेळाप्रती असलेली निष्ठा आज एशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकापर्यंत पोहोचली आहे, याचा अभिमान वाटतो,” असे बुंदेले यांनी सांगितले. प्रिथिकाची मेहनत, प्रशिक्षक कुणाल टावरे यांचे मार्गदर्शन आणि पालकांचा भक्कम पाठिंबा यांचा या यशात महत्त्वाचा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यातही असोसिएशनच्या माध्यमातून गुणवंत खेळाडूंना योग्य प्रशिक्षण आणि संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असेही बुंदेले यांनी स्पष्ट केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group