TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या’; प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येवर आदित्य ठाकरेंचा संताप

ठाण्यात ठाकरे गटाच्या विभागप्रमुखाची गोळ्या झाडून हत्या; आरोपींना आणि हत्येमागील शक्तींना तातडीने अटक करण्याची आदित्य ठाकरेंची मागणी

ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप (बाळू) पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री मानपाडा-मनोरमानगर परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पूर्णेकर यांच्यावर कार्यालयाबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ठाण्यात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या हत्येवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. “आमच्या पक्षाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची काल रात्री ठाणे परिसरात काही अज्ञातांकडून हत्या करण्यात आली. ही घटना अतिशय चीड आणणारी आणि घृणास्पद आहे. या राज्यात कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या झालेल्या आहेत हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतंय. सामान्य माणसाचं सुरक्षित जगणं कठीण होत चाललंय,” अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.

पुढे बोलताना आदित्य ठाकरे यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला. “पोलीस त्यांचं काम करण्याचा प्रयत्न करतील, पण राजकीय पक्षांकडूनच गुन्हेगारीला खतपाणी मिळणारं वातावरण तयार होत असेल तर पोलीस विभाग तरी काय करणार?” असा सवाल त्यांनी केला. हत्येतील आरोपी तसेच त्यामागील शक्तींना तातडीने अटक होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पूर्णेकर यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण प्रसंगातून सावरण्याचे बळ मिळावे, अशी प्रार्थना त्यांनी केली.

हेही वाचा –  वर्तणूक, देहबोली आणि आत्मविश्वासाच्या जोरावर नोकरी, व्यवसाय क्षेत्रात यशस्वी होता येते – डॉ. धनंजय मंडलिक

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून घटनास्थळ आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. हल्लेखोरांनी मोटारसायकलवरून येऊन हल्ला केल्याची माहिती समोर आली असून, हत्येमागील नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. पोलिसांकडून विविध शक्यता तपासल्या जात आहेत.

पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी या हत्येमागे ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, हे आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आले असून त्यांची स्वतंत्र पुष्टी अद्याप झालेली नाही. या आरोपांबाबत पोलिस तपासातूनच अधिकृत चित्र स्पष्ट होणार आहे.

पोलिसांनी आतापर्यंत काही संशयितांना ताब्यात घेतले असून आरोपींचा शोध सुरू आहे. हत्येचे कारण, हल्ल्यामागील व्यक्ती आणि कटाचा कोणता संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे. पूर्णेकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांकडून आरोपींना अटक होईपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका घेतल्याची माहितीही समोर आली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group