राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात व्ही. के. माटे हायस्कूलच्या शार्दुल देशिंगेचा गौरव
‘स्वच्छता स्तंभ’ प्रकल्पास राष्ट्रीय पातळीवर द्वितीय क्रमांक

पिंपरी | चिंचवड येथील व्ही. के. माटे हायस्कूलचा विद्यार्थी शार्दुल देशिंगे याने राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान स्पर्धेत घवघवीत यश मिळवत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ‘जीएमआरटी’ (GMRT) तर्फे आयोजित राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन – ऑनलाइन प्रकल्प स्पर्धेत (National Science Exhibition – Online Project Competition) शार्दुलच्या ‘स्वच्छता स्तंभ’ (Swachata Stambh) या प्रकल्पाला देशभरातून द्वितीय क्रमांक मिळाला.
देशभरातील विविध शाळांमधून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्पांमधून शार्दुलच्या या प्रकल्पाची निवड करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यांच्या कडेला वाढणाऱ्या कचऱ्याची समस्या तसेच त्यामुळे निर्माण होणारे दुर्गंधी व आरोग्याचे धोके लक्षात घेऊन त्याने हा अभिनव उपाय विकसित केला आहे.

हेही वाचा
विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र देशासाठी आदर्श निर्माण करेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
काय आहे ‘स्वच्छता स्तंभ’?
शहरांमधील जागेच्या कमतरतेवर मात करण्यासाठी शार्दुलने उभ्या स्वरूपात (Vertical Management) कचरा साठवण्याची यंत्रणा तयार केली आहे. यात कचरा ठरावीक पातळीपर्यंत भरल्यानंतर तो वरच्या दिशेने हलवला जातो. अत्यंत कमी जागेत जास्तीत जास्त कचरा कार्यक्षमतेने साठवणे आणि त्याचे सुलभ व्यवस्थापन करणे या संकल्पनेमुळे शक्य होते.
या यशासाठी शार्दुलला वर्गशिक्षक श्री. हुचगोळ सर आणि विज्ञान शिक्षिका सौ. मीना सपकाळ यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. इंद्रायणी पिसोळकर यांचे विशेष प्रोत्साहन लाभले. शार्दुलच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा व्यवस्थापन, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी त्याचे भरभरून कौतुक केले असून सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





