महाराष्ट्रात विद्यार्थी निवडणुकांची पुन्हा चाहूल; 12 सदस्यीय समिती स्थापन
एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश; निवडणूक प्रक्रिया, राजकीय हस्तक्षेप, पारदर्शकता आणि डिजिटल व्यवस्थेचा समितीकडून अभ्यास

मुंबई : महाराष्ट्रातील महाविद्यालये आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थी निवडणुका पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. विद्यार्थी निवडणुकांचा आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारने 12 सदस्यीय समिती स्थापन केली असून, या समितीला एका महिन्यात अहवाल सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. समिती विविध घटकांशी चर्चा करून शांततापूर्ण, पारदर्शक आणि सर्वसमावेशक विद्यार्थी निवडणुका घेण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा अभ्यास करणार आहे. मात्र, समितीच्या अहवालानंतरच निवडणुका प्रत्यक्षात कधी आणि कोणत्या पद्धतीने घ्यायच्या, याबाबत पुढील निर्णय होणार आहे.
राजकीय हस्तक्षेप रोखण्यावर भर
समितीकडून विद्यार्थी निवडणुकांमध्ये बाह्य राजकीय हस्तक्षेप आणि प्रक्रियेच्या व्यापारीकरणाला आळा घालण्यासाठी उपाययोजनांचा विचार केला जाणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी परिषदेच्या निधीचे व्यवस्थापन व लेखापरीक्षण, निवडून आलेल्या प्रतिनिधींसाठी अभिमुखता आणि प्रशिक्षण तसेच उमेदवारी अर्ज, छाननी आणि तक्रार निवारणासाठी डिजिटल प्रणालीचा वापर यांचाही अभ्यास केला जाणार आहे.
महिला, विविध आरक्षित प्रवर्गांतील विद्यार्थी तसेच NSS, NCC, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रतिनिधित्व देण्याची यंत्रणाही समिती तपासणार आहे.
हेही वाचा – प्रीती झिंटाच्या ‘Team Tukaram Mundhe’ टी-शर्टवर मुंढे स्पष्टच बोलले; ‘फक्त नाव लावून चालणार नाही’
1990 च्या दशकापासून निवडणुकांना ब्रेक
महाराष्ट्रात विद्यार्थी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंसाचाराच्या घटना घडल्यानंतर 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला थेट आणि स्पर्धात्मक विद्यार्थी निवडणुकांवर निर्बंध आले. त्यानंतर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, 2016 अंतर्गत विद्यार्थी परिषदांची तरतूद करण्यात आली. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने 2018 मध्ये विद्यार्थी परिषद निवडणुकीसाठी प्रक्रिया, निवडणूक प्राधिकरण, आचारसंहिता आणि तक्रार निवारणाबाबत नियमही जारी केले होते.
2019 मध्ये निवडणुका घेण्याची तयारी झाली होती; मात्र कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्या पुढे ढकलण्यात आल्या. त्यानंतर कोविड महामारी आणि इतर घडामोडींमुळे हा विषय मागे पडला.
विद्यार्थी निवडणुकांच्या मागणीला पुन्हा जोर
अलीकडील शिक्षणविषयक विद्यार्थी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी प्रतिनिधित्वाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. त्यामुळे 2019 नंतर विद्यार्थी निवडणुकांच्या दिशेने राज्य सरकारकडून करण्यात आलेली समितीची स्थापना हे महत्त्वाचे प्रशासकीय पाऊल मानले जात आहे.
आता समितीसमोर निवडणुका पुन्हा सुरू करताना येणाऱ्या कायदा-सुव्यवस्था आणि व्यवस्थापनाशी संबंधित अडचणींचा अभ्यास करण्याबरोबरच कॅम्पसमध्ये पारदर्शक पद्धतीने निवडणुका घेण्यासाठी कार्यपद्धती सुचवण्याची जबाबदारी आहे.




