पारधी समाजातील एकही पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहणार नाही; अशोक वुईके यांची ग्वाही
२२ पारधी बेड्यांचे सर्वेक्षण करून कागदपत्रे व योजनांची माहिती संकलित करण्याचे निर्देश; क्रांतिवीर समशेर सिंह पारधी यांच्या नावाने विकास पॅकेजचा प्रस्ताव मांडणार

चंद्रपूर : भटकंतीच्या जीवनपद्धतीमुळे पारधी समाजातील अनेक कुटुंबांकडे जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, शिधापत्रिका यांसारखी मूलभूत कागदपत्रे नाहीत. परिणामी अनेक कुटुंबे शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. ‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून पारधी समाजबांधवांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देत त्यांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.
पिपरबोडी पारधी टोला (चिनोरा, ता. वरोरा) येथे आदिवासी विकास विभागाच्या वतीने आयोजित ‘सेवा संकल्प अभियान’ आणि पारधी समाज मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार करण देवतळे, जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
२२ पारधी बेड्यांपर्यंत पोहोचणार योजना
राज्य शासनाने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाच्या माध्यमातून प्रशासनाने नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना विविध शासकीय सेवा आणि योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यावर भर दिला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील २२ पारधी बेड्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचविण्यात येणार असल्याचे डॉ. वुईके यांनी सांगितले.
पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी क्रांतिवीर समशेर सिंह पारधी यांच्या नावाने विशेष पॅकेज जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – दुष्काळी आढावा बैठकीतील काजू-बदामावरून सुषमा अंधारेंची टीका; ‘शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी पळालं’
प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश
पारधी समाजातील कुटुंबांकडे कोणती कागदपत्रे नाहीत, कोणत्या शासकीय योजनेची आवश्यकता आहे आणि आतापर्यंत कोणत्या योजनांचा लाभ मिळाला आहे, याची माहिती संकलित करण्यासाठी प्रत्येक पारधी बेड्याचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले.
“वंचितांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि तत्परतेने सेवा द्यावी. पारधी समाजाकडे पाहण्याचा पोलिसांचा दृष्टिकोनही सकारात्मक असावा. समाजात शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी व्यापक जनजागृती करावी,” असे आवाहन त्यांनी केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील एकही पात्र पारधी समाजबांधव शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
CSR निधीतून मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न
आमदार करण देवतळे यांनी नागरिकांनी ‘सेवा संकल्प अभियानाचा’ लाभ घेण्याचे आवाहन केले. परिसरात कार्यरत असलेल्या मोठ्या कंपन्यांच्या CSR निधीतून ३० ते ३५ गावांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, रस्ते, नाल्या आणि अन्य मूलभूत सुविधा विकसित करण्यासाठी प्रयत्न करता येतील, असे त्यांनी सांगितले.
लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि योजनांचा लाभ
कार्यक्रमापूर्वी डॉ. अशोक वुईके यांनी विविध शासकीय विभागांनी उभारलेल्या सेवा व योजनांच्या स्टॉलची पाहणी केली. तसेच आरोग्य तपासणी शिबिरालाही भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला.
यावेळी विविध शासकीय योजनांच्या लाभांचे आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कात्यायनी महिला बचत गट, खेमजाई यांना चारचाकी वाहनासाठी अर्थसहाय्य देण्यात आले, तर कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अक्षय राणे यांना ट्रॅक्टरची चावी देण्यात आली. याशिवाय अन्य लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.





