HSC Board Exam 2027 : बारावीच्या परीक्षेची तारीख जाहीर; ८ फेब्रुवारीपासून लेखी परीक्षा
१६ मार्चपर्यंत परीक्षा; विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी मिळाला स्पष्ट कालावधी

मुंबई : इयत्ता बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना मिळालेले गुण महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी बारावीच्या परीक्षेची तयारी करत आहेत. दरम्यान, राज्य शिक्षण मंडळाने २०२७ मधील बारावीच्या लेखी परीक्षेची सुरुवात आणि समाप्तीची तारीख जाहीर केली आहे.
मंडळाच्या माहितीनुसार, इयत्ता बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होणार असून १६ मार्च २०२७ पर्यंत चालणार आहे. मात्र, कोणता विषय नेमक्या कोणत्या दिवशी आहे, याचे सविस्तर वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. विषयानुसार पेपरच्या तारखा जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यानुसार अभ्यासाचे अधिक अचूक नियोजन करता येणार आहे.
परीक्षेची सुरुवातीची तारीख जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना आता उपलब्ध कालावधी लक्षात घेऊन अभ्यासाचे नियोजन करता येणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासोबतच महत्त्वाच्या धड्यांची उजळणी, लेखी सराव आणि प्रश्नपत्रिका सोडवण्यावर विद्यार्थ्यांनी भर देणे आवश्यक आहे.
परीक्षेची तारीख जाहीर झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण जाणवू शकतो. मात्र, त्याचा परिणाम अभ्यासावर होऊ नये, यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने तयारी करणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमातील राहिलेले धडे पूर्ण करण्याबरोबरच शिकवून झालेल्या घटकांची नियमित उजळणी करावी. तसेच खेळ, व्यायाम आणि पुरेशी झोप यासाठीही वेळ देणे आवश्यक आहे.
परीक्षेपूर्वी उपलब्ध असलेल्या कालावधीचा योग्य वापर करून दररोज अभ्यासाचे उद्दिष्ट निश्चित केल्यास तयारी अधिक प्रभावीपणे करता येऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखेचा ताण न घेता नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





