महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून परिणामकारक कामाची अपेक्षा – सीमा सावळे
पिंपरी- पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूने बाधित रुग्णांची वाढती संख्या, डेंग्यू व इतर रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी वैद्यकीय विभागाची नुकतीच आढावा बैठक घेतली. त्यात विविध रोगांना आळा घालण्यासाठी महापालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजना, रुग्णांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधा, रुग्णालयांना व तेथील कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जाणून घेण्यात आल्या. स्थायीच्या अध्यक्षा सावळे यांनी वैद्यकीय विभागाकडून परिणामकारक कामाची अपेक्षा व्यक्त केली. त्यासाठी या विभागाला काय मदत हवी, ते सर्व देण्याची तयारी त्यांनी दर्शविली. परंतु, शहरातील नागरिकांच्या आरोग्याबाबत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा त्यांनी बैठकीत दिला.
या बैठकीला नगरसेविका आशा शेंडगे, वैशाली काळभोर, अनुराधा गोफणे, उत्तम केंदळे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आयुक्त मिनीनाथ दंडवते, वायसीएम रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मनोज देशमुख यांच्यासह महापालिकेच्या सर्व रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी, औषध भांडार विभागाचे सर्व व्यवस्थापक, फार्मासिस्ट, आरोग्य अधिकारी, आरोग्य निरीक्षक, सहाय्यक आरोग्य अधिकारी, मलेरिया निरीक्षक उपस्थित होते.