Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

मुंबई-गोवा महामार्गाचे काम ९३-९४ टक्के पूर्ण; ऑक्टोबरमध्ये गडकरी स्वतः पाहणार कामाची गुणवत्ता

महामार्गाला झालेल्या विलंबाबद्दल नितीन गडकरींकडून खेद; रखडलेल्या कामांना गती देण्याचे संकेत, कंत्राटदारांवर कठोर कारवाईचा इशारा

पणजी : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला आता अंतिम टप्प्यात गती देण्याचे संकेत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. महामार्गाचे काम ९३ ते ९४ टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित कामेही लवकर पूर्ण करण्यावर भर दिला जात असल्याचे गडकरी यांनी सांगितले. तसेच, या महामार्गाच्या कामाला झालेल्या विलंबाबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.

गोव्यातील पोरवोरिम सहापदरी उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला. “मुंबई-गोवा महामार्ग होण्यास उशीर झाला, ही दुर्दैवाची गोष्ट आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

ऑक्टोबरमध्ये गडकरी करणार पाहणी

मुंबई-गोवा महामार्गाचे काम ९३-९४ टक्के पूर्ण झाल्याची माहिती गडकरी यांनी दिली. ऑक्टोबरमध्ये मुंबई विमानतळावर उतरून रस्त्याने गोव्याला येणार असून, त्यावेळी महामार्गाचे काम प्रत्यक्ष पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे उर्वरित कामांच्या गुणवत्तेकडे आणि प्रगतीकडे केंद्रीय पातळीवरून लक्ष दिले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा –  महावितरणच्या सक्षमीकरणाला वेग; खासगीकरण होणार नाही, ग्राहकांना दर्जेदार वीजसेवेवर सरकारचा भर

अपयशी कंत्राटदारांवर कारवाईचे संकेत

महामार्गाचे काम रखडण्यामागे अनेक कंत्राटदार अपयशी ठरल्याचे गडकरी यांनी नमूद केले. “आता वर्षभरात जास्तीत जास्त कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करणे आणि अधिकाऱ्यांना निलंबित करणे हा आठवा विक्रम करायचा आहे,” असे त्यांनी सांगितले. त्यामुळे कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत मिळाले आहेत.

१५ वर्षांहून अधिक काळ रखडलेला महामार्ग

मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाला २०११ मध्ये सुरुवात झाली. त्यानंतर इंदापूर ते झाराप या दुसऱ्या टप्प्यातील कामाला २०१४ मध्ये सुरुवात झाली. ही कामे अपेक्षित कालावधीत पूर्ण न झाल्याने महामार्गाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. भूसंपादन, पर्यावरणीय मंजुरी आणि कंत्राटदारांकडून झालेला विलंब यामुळे कामाला वारंवार अडथळे आले.

दरम्यान, इंदापूर आणि माणगाव येथील बाह्यवळण मार्गांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. चिपळूण येथील उड्डाणपुलाचे कामही प्रलंबित आहे. नागोठणे येथील नव्या पुलाला तडे गेल्याने तो सध्या वाहतुकीसाठी बंद आहे. पुलाची दुरुस्ती, संरचनात्मक आणि सक्षमता चाचणी पूर्ण झाल्यानंतरच वाहतूक सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा महामार्ग महत्त्वाचा असल्याने उर्वरित कामे आणि पुलांच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना होणे अपेक्षित आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group