सत्तेत आलो तर बालविवाह करण्यास मंजुरी देणार, भाजपा उमेदवाराचं आश्वासन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/Rajasthan-Child-Marriage.jpg)
पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरु झाला असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार वेगवेगळी आश्वासनं देत आहेत. मतदारांचे बूट पॉलिश करण्यापासून ते आश्वासन पूर्ण न केल्यास चपलीने मारा असं म्हणण्यापर्यंत उमेदवार पोहोचले आहेत. मात्र अद्याप कोणत्याही उमेदवाराने सत्तेत आल्यास बालविवाहात दखल देणार नाही असं म्हटलं नव्हतं.
भाजपा उमेदवाराने प्रचारादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सत्तेत आल्यास बालविवाहात कोणतीही दखल देणार नाही असं आश्वासन भाजपा उमेदवाराने दिलं आहे. शोभा चौहान असं या भाजपा उमेदवाराचं नाव आहे. सोजात येथून त्या निवडणूक लढवत आहेत. ही जागा महिलांसाठी राखीव आहे. जर मी निवडून आले तर पोलीस बालविवाहात दखल देणार नाहीत असं आश्वासनच त्यांनी देऊन टाकलं.
राजस्थानमध्ये बालविवाह मोठी समस्या आहे. मात्र ही समस्या संपवण्यासाठी राजकीय नेत्यांकडून कोणताही प्रयत्न केला जात नाही आहे. याउलट राजकीय फायद्यासाठी मुद्द्याचा वापर केला जात आहे. दरम्यान भाजपाने आपल्या उमेदवाराने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर कोणतीही प्रतीक्रिय दिलेली नाही.
शोभा चौहान या आयएएस अधिकारी राजेश चौहान यांच्या पत्नी आहेत. दुसऱ्यांदा त्या निवडणूक लढवत आहेत. प्रचारादरम्यान त्यांनी वक्तव्य केलं की, एकदा मी सत्तेत आले की या परिसरातील लोकांना बालविवाहासंबंधी पोलिसांकडून कोणताही त्रास होणार नाही. धक्कादायक म्हणजे त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं..
जिल्हाधिकारी सुधीर कुमार शर्मा यांनी शोभा चौहान यांच्या वक्तव्याची दखल घेतली आहे. तसंच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपास करुन कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे.