‘हिंसाचार योग्य नाही’; डीजेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य
‘कायद्याच्या बडग्याने बंद न करता लोकांना विश्वासात घेऊन मार्ग काढावा’; पुण्यात पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्यावर फडणवीसांचा भर

पुणे : विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला आहे. पुणे दौऱ्यावर आले असताना माध्यमांशी बोलताना त्यांनी “हिंसाचार योग्य नाही. प्रत्येकाने आपापला मुद्दा मांडला पाहिजे,” अशी स्पष्ट भूमिका मांडली. गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रत्येकाचा दृष्टीकोन आणि विचार वेगवेगळे असू शकतात. काही लोक एका बाजूचे तर काही दुसऱ्या बाजूचे असू शकतात. मात्र, कोणत्याही मुद्द्यावर हिंसाचार करणे योग्य नाही. प्रत्येकाने आपला मुद्दा मांडला पाहिजे.
‘लोकांना विश्वासात घेऊन मार्ग काढणे गरजेचे’
सण आणि उत्सव शक्य तितक्या पारंपरिक पद्धतीने साजरे केले तर त्याचे महत्त्व अधिक असते, असेही फडणवीस यांनी सांगितले. वर्षानुवर्षे सण साजरे करताना काही पद्धती रूढ होतात. मात्र, त्या पद्धती बदलताना केवळ कायद्याचा बडगा न उगारता लोकांना विश्वासात घेऊन मार्ग काढणे अधिक गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
“कायदा वापरावा लागतो, त्याशिवाय काही गोष्टी बंद होत नाहीत. पण त्यासोबत लोकांना विश्वासात घेऊन त्यातून मार्ग काढणे गरजेचे आहे,” असे फडणवीस म्हणाले.
‘डीजेच्या प्रचंड आवाजाबाबत जवळपास सर्वांचं एकमत’
पुणे पोलीस आयुक्तांशी आज चर्चा झाल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. अनेक मुद्द्यांवर सर्वांचे एकमत होत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या प्रचंड आवाजाच्या डीजेबाबत जवळपास सर्वांचं एकमत होत असल्याचे फडणवीस म्हणाले.
“डीजेमध्ये भूकंप आल्यासारखा आवाज असतो. अशा सगळ्या गोष्टींवर जवळपास सर्वांचं एकमत होत आहे. पुण्यात गणेशोत्सव असो किंवा इतर उत्सव, ते चांगल्या पारंपरिक पद्धतीने साजरे होताना दिसतील,” अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा – ताप नसतानाही होऊ शकतो स्वाईन फ्लू; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
‘डीजेचं स्तोम लोकसहभागातून कमी होईल’
डीजेचा वापर कमी करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. लोकांच्या सहभागातूनच डीजेचे स्तोम कमी होताना आणि भविष्यात संपताना दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डीजेबाबत सरकार काही धोरण तयार करणार का, या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, “पॉलिसी एकदम तयार होत नाही. सगळ्या ठिकाणी चर्चेतून ९० ते ९५ टक्के लोक तयार होतात. मग आदेश काढता येतो.”
सध्या थोडा वेळ देण्याची गरज असून, दिशा निश्चित झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरे करण्याकडे वळायचे असून, प्रचंड ध्वनिप्रदूषणापासून दूर जायचे आहे, असे फडणवीस म्हणाले.
डीजेवरून मंडळांशी चर्चा करून मार्ग काढणार
काही गणेश मंडळांनी डीजे वापरणारच, अशी भूमिका घेतली आहे. याबाबत पोलिसांकडून संबंधित मंडळांशी चर्चा करून मार्ग काढला जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर डीजे आणि ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात डीजेच्या वापराबाबत प्रशासन आणि गणेश मंडळांमध्ये होणाऱ्या चर्चेकडे लक्ष लागले आहे.




