FDA Raid: ‘वायसीएम’ कँटीनवर FDAचा छापा; ४ खाद्यपदार्थांचे नमुने ताब्यात
कँटीन चालक शिवसेना शिंदे गटातील स्थानिक नेत्याचा निकटवर्ती?

भेसळीच्या संशयाने कारवाई; १४ दिवसांची कारणे दाखवा नोटीस
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील कँटीनच्या कारभारावर अखेर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा बडगा उगारला आहे. अन्नपदार्थांचा दर्जा, स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांच्या पालनाबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर FDAच्या पथकाने कँटीनवर अचानक छापा टाकला. तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींनंतर भेसळीच्या संशयावरून चार खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी कँटीन चालकाला १४ दिवसांची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे FDAकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, संबंधित कँटीन चालकाचे शिवसेना शिंदे गटातील एका स्थानिक नेत्याशी निकटचे संबंध असल्याची चर्चा रुग्णालय परिसरात सुरू आहे. त्यामुळे FDAच्या कारवाईनंतर या राजकीय कनेक्शनचीही चर्चा रंगली आहे. मात्र, या संबंधाबाबत अधिकृत दुजोरा अद्याप समोर आलेला नाही.
रुग्णालयातील कँटीन, पण तक्रारींचा ढीग
वायसीएम रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येतात. त्यामुळे रुग्णालयातील कँटीनमधील अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छता हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. कँटीनमधील अन्नाबाबत निकृष्ट दर्जा आणि स्वच्छतेच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने FDAने ही तपासणी केली. तपासणीदरम्यान कँटीनमधील स्वच्छता आणि अन्न सुरक्षा मानकांच्या पालनाबाबत काही त्रुटी आढळल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर चार खाद्यपदार्थांचे नमुने घेण्यात आले. हे नमुने शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवालात नेमके काय समोर येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा
‘पाणी’ही विकतच घ्यायचे?
FDAच्या कारवाईनंतर कँटीनच्या अन्य कारभारावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. कँटीनमध्ये ग्राहकांच्या टेबलवर पिण्यासाठी पाणी दिले जात नसल्याची तक्रार रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनी केली आहे. विकतचे पाणी घेण्यासाठीच टेबलवर पाणी दिले जात नसल्याचा आरोप ग्राहकांकडून करण्यात येत आहे. याबाबत कँटीन चालकाकडून पाणी सांडल्यानंतर त्यावरून एक रुग्ण घसरून पडल्याची घटना घडली होती, त्यामुळे टेबलवर पाणी देणे टाळले जात असल्याचे कारण दिले जात असल्याची माहिती आहे. मात्र, रुग्णालयातील कँटीनमध्ये पिण्याच्या पाण्याची योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कोणाची, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
राजकीय ‘वजन’ असल्याने तक्रारींकडे दुर्लक्ष?
संबंधित कँटीन चालकाचे शिवसेना शिंदे गटातील स्थानिक नेत्याशी निकटचे संबंध असल्याची चर्चा असल्याने या राजकीय कनेक्शनमुळे कँटीनच्या कारभाराला संरक्षण मिळते का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. तक्रारी वारंवार होत असताना FDAची कारवाई होण्यासाठी एवढा कालावधी का लागला? रुग्णालय प्रशासनाने यापूर्वी कँटीनची तपासणी केली होती का? कँटीन चालकावर यापूर्वी कोणती कारवाई झाली होती का? तसेच कँटीनचा ठेका देताना अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या अटींची पूर्तता करण्यात आली होती का, असे अनेक प्रश्न आता पुढे आले आहेत. दरम्यान, FDAच्या प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच अन्नपदार्थांमध्ये भेसळ झाली आहे की नाही, याचे अधिकृत चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोष सिद्ध झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होते का आणि कँटीनच्या व्यवस्थापनावरही जबाबदारी निश्चित केली जाते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या कँटीनच्या कारभारात राजकीय हस्तक्षेपाला थारा मिळता कामा नये, अशी अपेक्षा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांकडून व्यक्त होत आहे.





