फलटण उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या; माजी मंत्र्यांच्या ओएसडीवर गंभीर आरोप

Dr Rajendra Rupnawar | फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले २७ वर्षीय युवा वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र जगन्नाथ रुपनवर यांनी सोमवारी सकाळी दहा वाजता अखेरचा श्वास घेतला. वरिष्ठांच्या जाचाला आणि मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप होत आहे. या घटनेत माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांवर (OSD) गंभीर आरोप झाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
डॉ. राजेंद्र रुपनवर यांना रुग्णालयातील काही वरिष्ठ डॉक्टरांकडून सातत्याने त्रास दिला जात असल्याची तक्रार होती. या प्रकरणात प्राथमिक चौकशीअंती जिल्हा वैद्यकीय अधीक्षकांवर आधीच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
या दुर्दैवी घटनेवर बोलताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, “या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. परंतु जीव देणे हा कोणत्याही समस्येवरचा पर्याय असू शकत नाही. आपल्यावर अन्याय झाला तर त्यासाठी संविधानिक व कायदेशीर मार्गाने लढले पाहिजे. कोणत्याही संकटात टोकाचे पाऊल उचलणे योग्य नाही.”
हेही वाचा
Nepal Floods: मृतांचा आकडा ९३९ वर, ४ हजारांहून अधिक नागरिक अजूनही बेपत्ता
डॉ. रुपनवर आणि माजी मंत्र्यांचे ओएसडी यांच्यातील वाद तसेच चिठ्ठीमध्ये आलेल्या नावांचा संदर्भ विचारला असता आरोग्यमंत्री म्हणाले, “आपल्या देशाच्या संविधानानुसार तक्रार आल्यानंतर पोलिसांनी डॉ. रुपनवर यांची रितसर तक्रार नोंदवून घेतली होती. पोलीस तपास करून सत्य समोर आणतील. कायदा सर्वांपेक्षा मोठा असून कायद्यापुढे कोणीही लहान किंवा मोठा नाही. त्यामुळे चौकशीत दोषी आढळणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही.”
या प्रकरणी कारवाईचे टप्पे स्पष्ट करताना आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, “पहिले पाऊल म्हणून या प्रकरणात पोलिसांत फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात आमच्या चौकशी समितीच्या अहवालानुसार संबंधित जिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. आता पोलीस तपासात ज्यांची ज्यांची नावे निष्पन्न होतील, त्या सर्व संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.” या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.





