शिक्षण विभागाकडून मानधन तत्वावर होणार 70 शिक्षकांची भरती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/02/1pcmc_1.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक विभागाकडून स्पोकन इंग्रजी शिकविण्यासाठी 70 शिक्षकांची भरती घेण्यात येणार आहे. दरमहा प्रतिशिक्षक दहा हजार रुपये मानधन तत्वावर सहा महिने कालावधीसाठी पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शिक्षक विभागाकडून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहे.
शहरामध्ये महापालिकेच्या 106 प्राथमिक शाळा आहेत. इंग्राजी, हिंदी, मराठी आणि उर्दू शाळांचा त्यामध्ये समावेश आहे. या शाळेत शिकणारे विद्यार्थी इंग्रजी विषयात मागे पडत असल्याचे स्पष्ट झाल्याने शिक्षण विभागाची धडपड सुरू झाली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलायला शिकविण्यासाठी 70 शिक्षकांची भरती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये अजा 9, अ.ज. 5, वि.जा.अ. 2, भ.ज.ब. 2, भ.ज.क. 2, भ.ज.ड 1, वि.मा.प्र. 1, इ.मा.व. 13, खुला 34 अशा एकूण 70 जागांचा प्रवर्ग ठरलेला आहे.
शिक्षण विभागाकडून उमेदवारांचा अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवाराचे डी.एड. इंग्रजी माध्यमातून अपेक्षीत आहे. त्याने पहिली ते पदवीधर संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून पूर्ण केलेले असावे. उमेदार इंग्रजी/मराठी माध्यमातून टीईटी व अभियोग्यता चाचणी उत्तीर्ण झालेला असावा, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.