Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘रायगड जिल्ह्यातील क्रीडा संकुलांचा विकास स्थानिक गरजांनुसार करा’; मंत्री आदिती तटकरे

मुंबई : तळा, श्रीवर्धन, म्हसळा आणि रोहा येथील क्रीडा संकुलांच्या विकासकामांमध्ये स्थानिक खेळाडूंच्या गरजा आणि त्या-त्या तालुक्यातील लोकप्रिय खेळांचा विचार करूनच नियोजन करण्यात यावे. तसेच प्रशासकीय मान्यता प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पुढील १० ते १२ दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

तळा, श्रीवर्धन आणि रोहा येथील क्रीडा संकुलांच्या विकास, नूतनीकरण आणि विविध सुविधांच्या आराखड्याबाबत आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी रायगड जिल्हाअधिकारी किशन जावळे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कार्यकारी अभियंता यावेळी उपस्थित होते. तळा, श्रीवर्धन आणि रोहा येथील क्रीडा संकुलांसाठी तयार करण्यात आलेल्या मास्टर प्लॅनचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

मंत्री आदिती तटकरे यांनी प्रत्येक क्रीडा संकुलाची उभारणी संबंधित तालुक्यातील गरजा लक्षात घेऊन करावी, असे  निर्देश दिले. तळा येथे क्रिकेट स्पर्धा मोठ्या प्रमाणावर होत असल्याने क्रिकेट मैदानासाठी पुरेशी जागा राखून ठेवण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. त्याचप्रमाणे रोहा आणि श्रीवर्धन येथील क्रीडा संकुलांमध्ये स्थानिक पातळीवर खेळल्या जाणाऱ्या खेळांना प्राधान्य देत टप्प्याटप्प्याने काम पूर्ण करावे. आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले. विद्यमान संरचनेचा वापर करून मल्टीपर्पज हॉलसह विविध सुविधा उभारण्याचे नियोजन फेज-१ आणि फेज-२ अशा दोन टप्प्यांत राबविण्यात यावा असेही मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या.

हेही वाचा –  ‘गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तळासाठी साठवण टाकी, पाइपलाइनसाठी सोर्स निश्चित करून प्रस्ताव सादर केल्यास पाणीपुरवठा सुरळीत करता येईल, क्रीडा संकुलातील दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करा, इनडोअर खेळाला प्रोत्साहन देत साहित्य उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तळा क्रीडा संकुलाच्या संरक्षणासाठी संरक्षक भिंत उभारण्याच्या प्रस्तावावरही यावेळी चर्चा झाली.

क्रीडा संकुलांच्या विकासासाठी आवश्यक प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता प्रक्रियेचा यावेळी आढावा घेण्यात आला. संबंधित प्रस्ताव आयुक्त आणि क्रीडा विभागाकडे पाठविण्यात आले असून मान्यता प्राप्त होताच निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. याशिवाय श्रीवर्धनसह विविध ठिकाणच्या कामांची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कंत्राटदारांची देयके मंजूर झाल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.

पाणंद रस्त्याच्या प्रशासकीय मान्यता तातडीने घ्या

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत सर्व ऋतूंमध्ये पोहोचता यावे, शेती यंत्रसामग्रीची वाहतूक सुलभ व्हावी आणि शेतमाल बाजारपेठेत नेणे सोपे व्हावे यासाठी शेतपाणंद रस्त्यांचे बांधकाम व मजबुतीकरण केले जाते. या योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील पाणंद रस्त्यांची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. तसेच ज्या रस्त्यांना तांत्रिक मान्यता प्राप्त झाली आहे, त्या कामांना प्रशासकीय मान्यता तातडीने देऊन अंमलबजावणीला वेग द्यावा, असेही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशित केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button