“धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला तर सरकार कोसळणार नाही”; अण्णा हजारे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

Anna Hazare | नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. अण्णांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याने सरकार कोसळणार नाही, उलट यामुळे प्रशासकीय कामकाज अधिक जबाबदार आणि प्रभावी होईल, असा सल्ला त्यांनी पत्रातून दिला आहे.
पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात अण्णा हजारे यांनी म्हटले आहे की, “आंदोलनादरम्यान झालेला हिंसाचार आणि पोलिसांच्या कारवाईची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. आंदोलक विद्यार्थ्यांच्या या रोषाकडे केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून न पाहता, ती समाजाची वेदना आणि अपेक्षा आहे या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे.” सरकारने आंदोलकांचे म्हणणे संयमाने ऐकून घ्यावे, विश्वासाचे वातावरण निर्माण करावे आणि सकारात्मक संवादातून यावर तोडगा काढावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
हेही वाचा
नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरसाठी १७५ कोटींचा निधी
अण्णा हजारे यांचे ‘मौन आंदोलन’
दरम्यान, १५ वर्षांपूर्वी ज्या जंतर-मंतरच्या व्यासपीठावरून अण्णांनी ऐतिहासिक उपोषण केले होते, त्याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ अण्णा हजारे आज मौन आंदोलन करणार आहेत.
वांगचुक यांच्या आंदोलनाचा पुनरुच्चार
या पत्रासोबतच अण्णा हजारे यांनी लडाखचे हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा मुद्दा पुन्हा अधोरेखित केला. वांगचुक यांना बळजबरीने उचलून रुग्णालयात दाखल करण्याच्या कारवाईवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. अण्णा म्हणाले, “सरकारने वांगचुक यांच्या सहनशक्तीची परीक्षा घेऊ नये. त्यांच्या मागण्यांवर ‘हो’ किंवा ‘नाही’ जे काही असेल ते स्पष्ट सांगावे. चर्चेविना प्रश्न सुटू शकत नाहीत; सलोख्याने आणि सामंजस्याने मार्ग काढण्याऐवजी बळजबरी केली तर परिस्थिती अधिक बिकट होते.”
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा





