Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

मोशी कचरा डेपो दुर्घटना: ४ दिवसांनंतर अखेर शोधकार्य संपले; मृतांची संख्या ९ वर

पिंपरी-चिंचवड | मोशी येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कचरा डेपोत घडलेल्या भीषण दुर्घटनेतील शोधमोहीम अखेर रविवारी मध्यरात्री १ वाजता संपली आहे. बुधवारपासून सुरू असलेल्या या युद्धपातळीवरील बचावकार्यात शनिवारी चौथ्या दिवशी इमारतीमधून ७ जणांचे, तर मध्यरात्री कचऱ्याच्या ढिगाऱ्याखालून एकाचा मृतदेह हाती आला. यापूर्वी गुरुवारी एकाचा मृतदेह सापडला होता. त्यामुळे या अत्यंत दुर्दैवी दुर्घटनेतील एकूण मृतांची संख्या आता ९ झाली आहे.

८ जुलै (बुधवार) रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मोशी कचरा डेपोमधील कचऱ्याचा प्रचंड मोठा ढीग ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळला. या दुर्घटनेत इमारतीमध्ये २२ आणि इमारतीशेजारी कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली १ असे एकूण २३ नागरिक अडकले होते. त्यापैकी ५ नागरिक सुरुवातीलाच सुखरुप बाहेर पडले. उर्वरित नागरिकांना वाचवण्यासाठी भारतीय सेना, एनडीआरएफ (NDRF), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे तात्काळ बचावकार्य सुरू केले. पहिल्याच दिवशी इमारतीतील ९ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले होते.

अडथळ्यांमुळे मलबा हटवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणांचा वापर

दुर्घटनाग्रस्त इमारत अत्यंत धोकादायक आणि अस्थिर झाल्यामुळे आत प्रवेश करण्यासाठी बचाव पथकासमोर मोठे आव्हान होते. सुरक्षित मार्ग तयार करण्यासाठी १२ पोकलेन, डंपर आणि जेसीबी मशीनच्या सहाय्याने मलबा हटवण्याचे काम सुरू करण्यात आले. शुक्रवारी रात्री इमारतीचा धोकादायक काँक्रिट भाग नियंत्रित पद्धतीने पाडण्यासाठी दोन अत्याधुनिक ‘डिमोलीशन एक्सकॅव्हेटर मशिन’ मागवण्यात आल्या आणि एनडीआरएफच्या मार्गदर्शनाखाली इमारतीचा अस्थिर भाग हटवून आत प्रवेश करण्यात आला.

हेही वाचा

देशातील सर्वात मोठ्या ॲग्रिकल्चरल कन्व्हेंशन सेंटरच्या कामाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी

रुग्णालयाकडून ९ जणांना मृत घोषित; मृतांची नावे खालीलप्रमाणे:

१. भावेश वाणी: (यांचा मृतदेह गुरुवारी, ९ जुलै रोजी इमारतीतून बाहेर काढण्यात आला होता.)

शनिवारी रात्री ८ वाजेपर्यंत इमारतीत आढळलेले ७ मृतदेह:

२. अक्षय सावंत (वय ३५, रा. मोशी)
३. सुनील कोरके (वय ४०, रा. आळंदी)
४. सन्नी माने (वय ३९, रा. गंधर्वनगरी, मोशी)
५. महेश कुंभार (वय ३३, रा. छत्रपती संभाजीनगर)
६. नागेश गायकवाड (वय २६, रा. संजय गांधी नगर, मोशी)
७. रणजीत पाटील (वय २२, रा. मोशी)
८. राहुल गायकवाड (वय ३५, रा. मोशी)

शनिवारी मध्यरात्री १ वाजता कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली सापडलेला मृतदेह:

९. वामन कसबे: इमारतीशेजारील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या वामन कसबे यांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या श्वान पथकाची (Dog Squad) मदत घेण्यात आली. मध्यरात्री १ वाजता त्यांचा मृतदेह हाती आला.

बचाव पथकाने शोधून काढलेल्या या सर्वांना तातडीने पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पाठवण्यात आले होते. मात्र, पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे आणि डॉक्टरांनी तपासणीअंती या सर्वांना मृत घोषित केले. बुधवार दुपारी अडीच वाजल्यापासून सुरू झालेले हे थरारक आणि आव्हानात्मक शोधकार्य तब्बल ८० तासांनंतर रविवारी मध्यरात्री संपले असून, या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button