FIFA World Cup: मेस्सी, एम्बाप्पे की हालंड? फिफाच्या ‘गोल्डन बूट’वर कोण कोरणार नाव?

FIFA World Cup 2026 | फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धा आता अत्यंत अटीतटीच्या आणि अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. राऊंड ऑफ १६ चे सामने संपल्यानंतर आता उपांत्यपूर्व फेरीची (Quarter Finals) रणधुमाळी सुरू होणार आहे. जगातील एकूण ६४ बलाढ्य संघांमधून आता केवळ ८ संघ शिल्लक राहिले असून, त्यांच्यात ट्रॉफीसाठी लढत होणार आहे. यासोबतच, या विश्वचषकात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला दिला जाणारा ‘गोल्डन बूट’ (Golden Boot) पुरस्कार कोण पटकावणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
यंदाच्या विश्वचषकात अर्जेंटिनाने अप्रतिम कामगिरी केली आहे. राऊंड ऑफ १६ च्या सामन्यात इजिप्तका पराभव करत अर्जेंटिनाने दिमाखात टॉप-८ मध्ये प्रवेश केला. अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी सध्या ८ गोलसह गोल्डन बूटच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहे. विशेष म्हणजे, मेस्सीने आजवरच्या कारकिर्दीत एकदाही गोल्डन बूट जिंकलेला नाही. २०२२ च्या विश्वचषकात अर्जेंटिनाने जेतेपद मिळवले असले, तरी मेस्सी ७ गोलसह दुसऱ्या स्थानावर राहिला होता. त्यामुळे यंदा मेस्सी इतिहास रचणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष आहे.
मेस्सीला मागे टाकण्यासाठी फ्रान्सचा किलियन एमबाप्पे आणि नॉर्वेचा अर्लिंग हालंड सज्ज आहेत. एमबाप्पेने स्पर्धेत आतापर्यंत ७ गोल करत गोलदात्यांच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. २०२२ विश्वचषकात ८ गोलांसह त्याने गोल्डन बूटचा मान पटकावला होता. हालंडनेही स्पर्धेत ७ गोलांची नोंद करत तिसरे स्थान पटकावले आहे. नॉर्वेच्या या युवा स्टारने सातत्यपूर्ण दमदार कामगिरी केली आहे. मेस्सी, एमबाप्पे आणि हालंड हे तिन्ही स्टार खेळाडू सध्या आपल्या संघांसह उपांत्यपूर्व (क्वार्टर फायनल) फेरीत पोहोचले आहेत. त्यामुळे आगामी सामन्यांत अधिक गोल करून अव्वल स्थान पटकावण्याची सुवर्णसंधी तिघांकडेही आहे.
हेही वाचा
जगावर पुन्हा युद्धाचं सावट! शांतता करार मोडताच अमेरिकेचे इराणवर भीषण हल्ले
क्वार्टर फायनलचे संपूर्ण वेळापत्रक (भारतीय वेळेनुसार)
- फ्रान्स विरुद्ध मोरोक्को – शुक्रवार, १० जुलै, पहाटे १:३० वाजता
- स्पेन विरुद्ध बेल्जियम – शनिवार, ११ जुलै, मध्यरात्री १२:३० वाजता
- इंग्लंड विरुद्ध नॉर्वे – रविवार, १२ जुलै, पहाटे २:३० वाजता
- अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड – रविवार, १२ जुलै, सकाळी ६:३० वाजता
या स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्याला ‘गोल्डन बूट’ तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील खेळाडूंना अनुक्रमे ‘सिल्व्हर’ आणि ‘ब्राँझ बूट’ देऊन गौरवले जाईल. त्यामुळे आता कोणती टीम वर्ल्डकप उंचावणार आणि कोणता खेळाडू फुटबॉल विश्वातील सर्वोच्च पुरस्कारावर आपले नाव कोरणार, याचा थरार येत्या काही दिवसांत पाहायला मिळेल.





